इंधन संपलं, दाट धुक्याने 'रनवे' दिसेना... डोळे बंद करुन पायलटनं केलं होतं लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 18:42 IST2025-06-13T18:34:50+5:302025-06-13T18:42:53+5:30

हा सिनेमा कोणता आहे आणि तो कुठे बघू शकता? वाचा एका क्लिकवर

Plane Crash: अहमदाबादमध्ये गुरुवारी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून लंडनच्या दिशेने निघालेले प्रवासी विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच मेघानीनगर भागातील नागरी वस्तीवर (Ahmedabad Plane Crash) कोसळले.

या विमान प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांच्यासह १७० भारतीय, ५३ ब्रिटिश, ७ पोर्तुगीज आणि कॅनडाच्या एका नागरिकाचा समावेश आहे. या विमानात २४२ प्रवासी होते. त्यांपैकी एकजण वगळता कोणीही बचावल्याची शक्यता नाही.

हे विमान दाट वस्तीतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळल्यामुळे तेथील काही शिकाऊ डॉक्टरांसह नागरिकांचाही मृत्यू झाला. तसेच अनेक जण जखमी झाले. शिवाय, अनेक इमारती आणि वाहनांचे मोठे नुकसान झाले.

अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे एक सिनेमा सध्या चर्चेत आला असून या सिनेमाची कहाणी सत्य घटनेवर आधारीत आहे.

हा बॉलिवूड चित्रपट २९ एप्रिल २०२२ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाचं नाव 'रनवे ३४' (Runway 34) असं आहे. यामध्ये अजय देवगण, अमिताभ बच्चन आणि रकुल प्रित सिंग मुख्य भुमिकेत आहेत.

या चित्रपटाचे कथानक २०१५ मध्ये दोहावरुन कोचीला येणाऱ्या जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यू ५५५ विमानासोबत घडलेल्या एका खऱ्या घटनेभोवती फिरतं.

चित्रपटाची सुरुवात दुबईहून कोचीला जाणाऱ्या एका विमानाने होते, पण कोचीमधील हवामान इतके बिघडते की तिथे लँडिंग करणे शक्य होत नाही. पायलट विक्रांत खन्ना (अजय देवगण) आणि त्याची सह-पायलट तान्या (रकुल प्रीत सिंग) विमान त्रिवेंद्रमला वळवण्याचा निर्णय घेतात, पण इथेही नशीब त्यांना साथ देत नाही. त्रिवेंद्रमही दाट धुक्याने वेढलेले असल्यानं तिथं लँड करण्याचा प्रयत्न फसतो.

पुढे परिस्थिती गंभीर बनते. इंधन संपण्याच्या मार्गावर असतं. कॅप्टन 'मे-डे' (Mayday) चा इशारा देतो. यानंतर खरा रोमांचकारी खेळ सुरू होतो.लँडिंग करण्यासाठी पर्याय शोधले जातात. मग वैमानिक एका विमानतळावर पुढे दरी असलेल्या 'रनवे ३४'वर डोळे बंद करुन विमानाचं लँडिंग करतो आणि शेवटी सर्व प्रवासी वाचतात.

त्यानंतर १५० लोकांचे जीव धोक्यात घालण्याच्या आरोपाखाली पायलटला चौकशीला सामोरे जावे लागतं. नारायण वेदांत (अमिताभ बच्चन) यांच्या नेतृत्वाखाली ही चौकशी सुरू होते. कॅप्टनच्या निर्णयांची जबाबदारी, तो डोळे बंद करुन का लँडीग करतो, या सत्याचा शोध चित्रपटात पाहायला मिळतो.

हा थरारक अनुभव घेण्यासाठी तुम्ही 'रनवे ३४' हा चित्रपट प्राईम व्हिडिओ (Prime Video) आणि ॲमेझॉन एमएक्स प्लेयरवर (Amazon MX Player) पाहू शकता.