सुशांतचं आत्महत्या प्रकरण, 'चुडेल' नाव, ड्रग्स अन् बरंच काही... वाचा रिया चक्रवर्ती काय म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 10:48 AM2023-10-06T10:48:52+5:302023-10-06T11:10:31+5:30

रिया चक्रवर्ती पहिल्यांदाच भरभरुन बोलली.

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हे नाव तसं सगळ्यांनाच माहित आहे. सुशांत सिंह राजपूतमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. अभिनेत्याच्या आत्महत्येला पूर्णपणे तिलाच जबाबदार ठरवलं गेलं.

रियाने सुशांतला जबरदस्ती ड्रग्स दिले, त्याचे पैसे लुटले, त्याला मानसिक दिला या आरोपांवरुन एनसीबीने तिची कसून चौकशी केली. रियाला काही महिने तुरुंगवासही भोगावा लागला. जामीन मिळाल्यानंतर आता कुठे रियाचं आयुष्य पूर्वपदावर येतंय.

रियाने नुकतंच इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये हजेरी लावली. यावेळी तिने सुशांत प्रकरणावर सविस्तर चर्चा केली. तसंच तुरुंगातील तिचे दिवस, मीडिया ट्रोलिंग यावरही ती बरंच काही बोलली.

रिया म्हणाली,'त्या कठीण काळात मला ३१ व्या वर्षी मी ८१ वर्षांची वृद्ध महिला असल्याची जाणीव होत होती. अशा वेळी मी थेरपीचा आधार घेतला. पण सगळं ठीक होईल हे मी स्वत:लाच सांगत होते. प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात. एक जे आपल्याला दिसतं आणि दुसरं जे आपण बघू शकत नाही.

जेव्हा मी लोकांचे चेहरे पाहते तेव्हा ते मला अपराधी नजरेनेच पाहतात. मला चुडैल हे नाव आवडलं. मला नाही फरक पडत. काय माहित मला खरंच काळी जादू येतही असेल. लग्नानंतर पुरुष जास्त दारु पितात याचं खापर स्त्रीवरच फोडलं जातं.

सुशांतला यशस्वी होता. पण त्याला मानसिक आजार का होता हे माहित नाही. आपल्याकडे मानसिक आजाराला चुकीच्या पद्धतीने घेतलं जातं. यशस्वी लोकही डिप्रेस होऊ शकतात. त्याने आत्महत्या का केली हे मला माहित नाही. पण तो कोणत्या परिस्थितीतून जात होता हे मला माहित आहे.

सुशांतला खरंच ड्रग्स दिलेस का? या प्रश्नावर रिया म्हणाली, अजिबात नाही आणि प्रामाणिकपणे सांगू तर मला या विषयावर बोलायचंच नाही. ना मला ड्रग्सवर बोलायचंय ना एनसीबीवर. आपण ते बोलायला बसलोय का. प्रकरण कोर्टात आहे आणि एजन्सीला त्यांचं काम करु द्या. मी आता यावर बोलून बोलून थकली आहे.

मी जेलमध्ये बरंच काही शिकले. मी अंडर ट्रायल होते. मी अपराधी नव्हते. आपण कसं सिनेमांच्या मागे धावतो. पण जेलमध्ये राहून मला कळलं की त्या महिला एक समोसा मिळाला तरी किती खूश व्हायच्या. मला जामीन मिळाल्यावर मी त्या महिलांसाठी नागिन डांस केला होता.

बॉलिवूडमध्ये चांगले आणि वाईट अशी दोन्ही लोकं आहेत. कित्येकदा तर मीच लोकांना सांगितलं की माझ्यासोबत काम करु नका नाहीतर तुम्हीही ट्रोल व्हाल. मला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे. पण प्रत्येक गोष्टीला एक योग्य वेळ असते.

रिया चक्रवर्ती आता आयुष्यात पुढे जात आहे. आज मी ज्या वळणावर आहे तिथे खूश आहे. अशा संकटाचा सामना करणाऱ्या मुलींसाठी माझं आयुष्य प्रेरणादायीच आहे.