Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:38 IST2025-09-15T12:29:59+5:302025-09-15T12:38:09+5:30

Ameesha Patel : ज्या चित्रपटात काम करते त्या चित्रपटाच्या दिग्दर्शक-निर्मात्याची चूक दाखवण्यासही मागेपुढे पाहत नाही.

अभिनेत्री अमिषा पटेल नेहमीच बिनधास्तपणे आपलं म्हणणं मांडत असते. ती ज्या चित्रपटात काम करते त्या चित्रपटाच्या दिग्दर्शक-निर्मात्याची चूक दाखवण्यासही मागेपुढे पाहत नाही. तिने एका मुलाखतीत बॉलिवूड इंडस्ट्रीबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे.

'कहो ना... प्यार है'च्या यशानंतरही तिला हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. इंडस्ट्रीमध्ये असे बरेच लोक आहेत ज्यांना ती आवडत नाही असंही तिने सांगितलं. अमिषा पटेलने 'झूम'शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

"तुम्ही कोणत्याही कँपचा भाग असलात तरी प्रेक्षकांचं प्रेम महत्त्वाचं आहे. कारण मी कोणत्याही विशिष्ट वर्तुळात बसत नाही. मी दारू पित नाही आणि धूम्रपान करत नाही किंवा कामासाठी कोणाचीही हाजीहाजी नाही."

"मी जे काही कमावलं आहे ते मी माझ्या मेहनतीच्या आधारे मिळवले आहे. यामुळे काही लोकांना मी आवडत नाही. मी कोणाच्याही मागे-पुढे फिरत नाही" असं म्हटलं आहे.

अमिषा पटेलने स्वतःला आऊटसायडर म्हटलं आणि तिच्यासाठी ते किती आव्हानात्मक होतं हे देखील सांगितलं, "जेव्हा तुमचा कोणी बॉयफ्रेंड किंवा नवरा नसतो तेव्हा इंडस्ट्रीमध्ये राहणं तुमच्यासाठी अधिक कठीण होतं."

"तुम्हाला इतरांकडून कमी पाठिंबा मिळतो. तुम्ही बाहेरचे असल्याने त्यांच्याकडे तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी कोणतंही विशेष कारण नसते. ९० टक्के सेलिब्रिटींनी सोशल मीडिया फॉलोअर्स खरेदी केले आहेत."

"एजन्सी लोकांशी संपर्क साधतात आणि मोठी रक्कम मागतात. तसेच त्या बदल्यात ते त्यांना लाखो फॉलोअर्स देण्याचे आश्वासन देतात. त्या एजन्सीने सर्वांशीच संपर्क साधला आहे."

"अनेक सेलिब्रिटीच्या सोशल मीडिया अकाउंट्सच्या फॉलोअर्सचा मोठा भाग पेड आहे. हे खरे फॉलोअर्स नाहीत. माझ्याकडे अनेक वेळा पैसे मागितले गेले पण मी नेहमीच नकार दिला."

"मला माझे खरे चाहते आवडतात. मी पैसे दिले आहेत म्हणून लोकांनी मला फॉलो करावं असं मला वाटत नाही. माझं इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर अकाउंट आहेत. मी कधीही कोणतंही फोटोशूट पोस्ट करत नाही."

"मी माझे फोटो जसे आहेत तसे अपलोड करते. माझ्या फोटोंमध्ये परफेक्ट कम्पोझिशन, कॅप्शन आणि फॉन्ट बरोबर नसतात. मला मी जशी आहे तसंच दिसायचं आहे. काहीही आधीच प्लॅन केलेलं नसतं" असं अमिषा पटेलने म्हटलं आहे.