पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 09:51 IST2025-12-03T09:51:08+5:302025-12-03T09:51:45+5:30
७ डिसेंबरला होणार लग्न? स्मृतीच्या भावाने दिली प्रतिक्रिया

पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
वृंदावन येथील प्रेमानंद महाराजांना मानणारे अनेक लोक आहेत. अगदी विराट कोहली-अनुष्का शर्माही मुलांना घेऊन प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला जाऊन आले आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारा संगीतकार पलाश मुच्छलही आता प्रेमानंद महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे. भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानासोबत लग्न स्थगित झाल्यानंतर आणि घडलेल्या सर्व प्रकरणानंतर दोन दिवसांपूर्वी पलाश पहिल्यांदाच विमानतळावर दिसला होता. तर आता तो थेट प्रेमानंद महाराजांच्या चरणी पोहोचला असल्याचं समोर आलं आहे. कारण त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
संगीतकार पलाश मुच्छलवर गेल्या काही दिवसांपासून स्मृती मंधानाला चीट केल्याचे आरोप होत आहेत. २३ नोव्हेंबर रोजी त्यांचं लग्न होणार होतं. मेहंदी, हळद, संगीत असे सगळे समारंभही वाजत गाजत झाले होते. पण अचानक त्यांचं लग्न पोस्टपोन झाल्याची बातमी आली. नंतर पलाश आणि स्मृतीच्या वडिलांची तब्येत बिघडल्याचं समोर आलं. इतकंच नाही तर पलाशने स्मृतीला चीट केल्याचीही चर्चा झाली. तर रेडिट या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो व्हायरल होतोय. यामध्ये पलाश प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात पोहोचला आहे. चेहऱ्यावर मास्क लावून तो महाराजांसमोर बसला आहे.
रेडिट युजरने हा दावा करत लिहिले, 'मी २ डिसेंबर रोजीचं प्रेमानंद महाराजांचं प्रवचन पाहत होतोय आणि मला १०० टक्के खात्री आहे की यामध्ये मास्क लावून बसलेला हा मुलगा पलाश मुच्छलच आहे. त्याच्या हातावर तीच मेहंदीही दिसत आहे जी त्याने लग्नासाठी लावली होती. मी खात्री करण्यासाठी त्याच्या मेहंदीचे फोटो पुन्हा पाहिले. तसंच तो वापरत असलेली जपनाम माला रिंगही दिसत आहे."

या पोस्टवर नेटकऱ्यांनीही सहमती दर्शवली आहे. तसंच प्रेमानंद महाराजांकडे जाण्याचा काय आता ट्रेंडच आला आहे का अशीही प्रतिक्रिया एकाने दिली आहे. 'आता हा सगळं कव्हर करण्यासाठी ही नाटकं करत आहे असं दिसतंय' असंही एकाने लिहिलं आहे.
पलाश मुच्छल आणि स्मृती मंधाना यांचं ७ डिसेंबरला लग्न होणार अशीही पोस्ट गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत होती. पण यात तथ्य नसल्याचं स्मृती मंधानाच्या भावाने स्पष्ट केलं. सध्या स्मृती आणि पलाश दोघांकडूनही या सर्व प्रकारावर कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही.