पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत वाईट वर्तन! गर्दीतील व्यक्तीने केला चुकीचा स्पर्श, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 12:52 IST2025-05-27T12:52:06+5:302025-05-27T12:52:52+5:30
पाकिस्तानी अभिनेत्रीला प्रमोशनल इव्हेंटदरम्यान शारीरिक छळाला सामोरं जावं लागलं असून अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे

पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत वाईट वर्तन! गर्दीतील व्यक्तीने केला चुकीचा स्पर्श, नेमकं काय घडलं?
शाहरुख खानच्या 'रईस' सिनेमातून झळकलेली पाकिस्तानी अभिनेत्री महिरा खानसोबत (mahira khan) चाहत्यांनी वाईट वर्तन केल्याचं समोर आलं आहे. माहिरा आणि तिचा सहकलाकार हमायून सईद हे लंडनमधील इल्फर्ड टाउन येथील इंडो-पाक सुपरमार्केटमध्ये त्यांच्या आगामी चित्रपट 'लव्ह गुरु'च्या प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सुरक्षा व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. याच गर्दीत चाहत्यांनी माहिरासोबत वाईट वर्तन केल्याचं उघडकीस आलं आहे.
माहिरा खान अस्वस्थ
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये महिरा खान चाहत्यांच्या गर्दीतून मार्ग काढताना दिसते. या व्हिडीओत माहिराच्या चेहऱ्यावर अस्वस्थपणा दिसतोय. या गोंधळात काही व्यक्तींनी माहिराला वाईट वागणूक देऊन तिला अनुचित स्पर्श केला, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली. या घटनेदरम्यान, तिचा सहकलाकार हमायून सईदने महिरा खानचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि सुरक्षा व्यवस्थेच्या अभावावर नाराजी व्यक्त केली.
अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे महिरा खानने आयोजकांकडे आपली नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटली असून, अनेकांनी आयोजकांच्या निष्काळजीपणावर टीका केली आहे. 'लव्ह गुरु' हा महिरा खान आणि हमायून सईद यांचा चित्रपट ६ जून २०२५ रोजी ईद-उल-अजहाच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान लंडनमध्ये ही घटना घडल्याने माहिरा खान चांगलीच अस्वस्थ झाली आहे.