प्रसिद्ध संगीतकाराने लता दीदींसोबत काम न करण्याची घेतली होती भीष्म प्रतिज्ञा, काय झालं होतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 09:17 IST2025-01-12T09:17:12+5:302025-01-12T09:17:45+5:30
बॉलिवूडच्या प्रसिद्ध संगीतकाराने लता दीदींसोबत काम न करण्याची भीष्म प्रतिज्ञा घेतली होती.

प्रसिद्ध संगीतकाराने लता दीदींसोबत काम न करण्याची घेतली होती भीष्म प्रतिज्ञा, काय झालं होतं?
ओ.पी. म्हणून ओळखले जाणारे ओंकार प्रसाद नय्यर(O.P. Nayyar), हे एक संगीतकार होते. ओंकार प्रसाद नय्यर यांचा जन्म भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी १६ जानेवारी १९२६ रोजी लाहोर येथे झाला. ते एक गायक-गीतकार, संगीत निर्माता आणि संगीतकार होता. त्यांनी चित्रपटसृष्टीला अनेक हिट गाणी दिली. त्यांनी त्यांच्या काळातील जवळजवळ सर्व मोठ्या गायकांसोबत काम केले. यामध्ये लता मंगेशकर (Lata Mangeshkar), आशा भोसले, गीता दत्त, मोहम्मद रफी आणि महेंद्र कपूर ही मोठी नावे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की ओ.पी. नय्यर आणि लता यांच्यात एका छोट्याशा कारणावरून भांडण झालं होतं. ज्यानंतर दोघांनी कधीच एकत्र काम केलं नाही.
१९५२ च्या 'आसमान' चित्रपटाने ओ.पी. नय्यर यांच्या यशाची क्षितिजे उघडली. पण, त्यांच्यात आणि लता मंगेशकर यांच्यात दरी निर्माण केली. दोघांनी पुन्हा कधीही एकत्र काम केले नाही. हा तो काळ होता जेव्हा लता मंगेशकर 'अनारकली', 'नागिन' आणि 'बैजू बावरा' सारख्या चित्रपटांसाठी गाणी गाऊन प्रसिद्धी मिळवू लागल्या. नायर यांनी लतादीदींना त्यांच्या 'आसमान' चित्रपटात गाण्यासाठी करारबद्ध केलं होतं.
'मोरी निंदिया चुरये गयो' या गाण्याच्या रेकॉर्डिंगची वेळ आली, तेव्हा लता मंगेशकर गायब होत्या. त्या वेळेवर पोहचल्या नाही. नाकात काही समस्या असून डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचं लता यांनी सांगितलं. तेव्हा ओ.पी. नय्यर यांनी स्पष्टपणे सांगितले की जे वेळेवर पोहोचू शकत नाही, त्यांचं माझ्यासाठी काही महत्त्व नाही. लतादीदींसोबत काम न करता प्रसिद्ध होवून दाखवणार अशी शपथ त्यांनी घेतली. यावर लता दीदींनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, ते काही सहमत झाले नाही. यावर लता दीदीदेखील नाराज झाल्या आणि आपण एका असंवेदनशील व्यक्तीसाठी गाणार नाही, असं म्हटलं. यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही आणि देश एका अजरामर जोडीला मुकला. आजही अनेक संगीतप्रेमीच्या ओठी ओपी नय्यर आणि लता मगेंशकर यांची गाणी ऐकायला मिळतात.