श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 13:39 IST2025-12-01T13:34:39+5:302025-12-01T13:39:43+5:30
Mrunal Thakur reacts on Shreyas Iyer: श्रेयस अय्यरचे नाव मृणाल ठाकूर हिच्याशी जोडण्यात येत आहे

श्रेयस अय्यरसोबत रिलेशनशिपच्या चर्चांवर अखेर मृणाल ठाकूरने सोडलं मौन; म्हणाली...
Mrunal Thakur reacts on Shreyas Iyer Rumors: क्रिकेट आणि बॉलिवूड यांचं एकमेकांशी असलेलं नातं नवीन नाही. कित्येक वर्षांपासून बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटपटू यांच्यातील प्रेमप्रकरणांच्या कहाण्या ऐकायला मिळतात. विराट कोहलीपासून ते केएल राहुलपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींसोबत संसार थाटला आहे. तशातच आता काही दिवसांपासून आणखी एक जोडीची चर्चा रंगली आहे. टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याचे नाव बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूर हिच्याशी जोडण्यात येत आहे. याबाबत चर्चांवर अखेर मृणाल ठाकूर हिने प्रतिक्रिया दिली आहे.
मृणाल ठाकूर ही एक उत्तम अभिनेत्री आहे. ती तिच्या अभिनयामुळे चर्चेत असते. तिने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांनी चाहत्यांची वाहवा मिळवली आहे. असे असताना मधल्या काळात मृणाल ठाकूर हिचे नाव साऊथस्टार धनुष सोबत जोडण्यात आले होते. त्या दौघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चा रंगल्या होत्या. या चर्चांवर दोघांपैकी कुणीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तशातच आता काही दिवसांपासून मृणालचे नाव श्रेयस अय्यरसोबत घेतले जाऊ लागले आहे. त्यामुळे अखेर या अफवांना पूर्णविराम देण्याच्या दृष्टीने तिने एक सूचक इन्स्टा स्टोरी पोस्ट केली.
मृणालने एक छोटीशी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली. या इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने एक व्हिडीओ पोस्ट केला. या पोस्टमध्ये ती केसांना छान मालिश करून घेत असताना दिसली. त्याचवेळी ती हसतानाही दिसली. तिने या व्हिडीओमध्ये खाली लिहिलेली कमेंट खूपच सूचक होती. तिने लिहिले, "लोक बोलतात (अफवा पसरवतात), आम्ही हसतो. अफवा म्हणजे फुकटचा पीआर आणि मला फुकटच्या गोष्टी आवडतात."

यातून मृणालने श्रेयस सोबतच्या नात्याबाबतच्या अफवांना पूर्णविराम दिला आहे. तसेच, श्रेयस अय्यरने देखील यावर कुठलीही प्रतिक्रिया न देता, याकडे दुर्लक्षच केले आहे.