एक नंबर तुझी कंबर! मृणाल ठाकूरने स्कॉटलंडच्या रस्त्यावर व्हायरल मराठी गाण्यावर धरला ठेका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 16:52 IST2025-05-29T16:51:42+5:302025-05-29T16:52:49+5:30
सध्या सर्वांनाच या गाण्याची भुरळ पडली आहे. मृणालनेही परदेशात या गाण्यावर ठेका धरला

एक नंबर तुझी कंबर! मृणाल ठाकूरने स्कॉटलंडच्या रस्त्यावर व्हायरल मराठी गाण्यावर धरला ठेका
अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) सध्या सिनेसृष्टीतला लोकप्रिय चेहरा आहे. हिंदी आणि साऊथमध्ये मृणालने आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. टीव्ही ते बिग स्क्रीन असा तिचा प्रवास राहिला आहे. मूळची धुळ्याची असलेल्या मृणालने मराठीतही काम केलं आहे. सध्या मृणाल आगामी 'सन ऑफ सरदार २'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. यानिमित्त ती स्कॉटलंडमध्ये आहे. 'स्कॉटिश स्ट्रीट्स'वर मृणालने 'एक नंबर तुझी कंबर' या व्हायरल मराठी गाण्यावर ठेका धरला.
'गुलाबी साडी' नंतर संजू राठोड 'एक नंबर तुझी कंबर' गाणं घेऊन आला आहे. त्याचे हेही गाणं सध्या तुफान गाजतंय. गुलाबी साडी जसं अख्ख्या देशभरात हिट झालं तसंच हेही हिट होतंय. अगदी इतर भाषिकही या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या व्हायरल गाण्यावर मृणाल ठाकुरनेही रील केलं आहे. स्कॉटलंडच्या रस्त्यावर ती थिरकली आहे. मागे स्कॉटिश स्ट्रीट्स आणि मृणाल 'एक नंबर तुझी कंबर' म्हणत मैत्रिणीसोबत डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
'स्कॉटिश स्ट्रीट्सवर मराठी गाण्यावर ठेका, तुम्ही कुठेही गेलात तरी तुमच्यातला मराठी बाणा जात नाही. या मजेशीर गाण्यावर आम्हीही थिरकलो' असं कॅप्शन तिच्या मैत्रिणीने दिलं आहे.
संजू राठोडच्या या गाण्याला युट्यूबवर तब्बल ३६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. हिंदी बिग बॉस फेम अभिनेत्री ईशा मालवीयने या गाण्यात डान्स केला आहे. इतरही अनेक सेलिब्रिटींनी गाणं रिक्रिएट केलं आहे. गाण्याची जादू दूरवर पसरत चालली आहे.