चित्रपटप्रेमी तरुणाईने बनवलेला‘जिंदगी विराट’ लवकरच रूपेरी पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 12:15 PM2017-09-18T12:15:18+5:302017-09-18T17:45:18+5:30

शहरभर लागलेली ‘जिंदगी विराट’ या चित्रपटाची पोस्टर्स सध्या उत्सुकतेचा विषय झाली आहेत. आगळेवेगळे नाव, पोस्टरवर दिसणारी दिग्गज कलाकारांची मांदियाळी, ...

'Zinti Virat' made by the filmmaker's youth, will soon be on the screen | चित्रपटप्रेमी तरुणाईने बनवलेला‘जिंदगी विराट’ लवकरच रूपेरी पडद्यावर

चित्रपटप्रेमी तरुणाईने बनवलेला‘जिंदगी विराट’ लवकरच रूपेरी पडद्यावर

googlenewsNext
>शहरभर लागलेली ‘जिंदगी विराट’ या चित्रपटाची पोस्टर्स सध्या उत्सुकतेचा विषय झाली आहेत. आगळेवेगळे नाव, पोस्टरवर दिसणारी दिग्गज कलाकारांची मांदियाळी, आणि चित्रपटाची भन्नाट गाणी यामुळे चर्चेत असलेला हा चित्रपट अजून एका कारणामुळे चर्चेत आहे आणि ते म्हणजे या चित्रपटनिर्मितीसाठी झटणारे तरुण चेहरे! चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक आणि संगीतकार यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. अंजनेय साठे या तरुण निर्मात्याने या चित्रपटाची निर्मिती केली असून चित्रपटाची कथा, पटकथा सुमित संघमित्र याची आहे तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील त्यानेच केले आहे. आणि चित्रपटातील ‘मल्हार’, ‘मखमली’ ही गाणी सध्या प्रचंड गाजतायेत. या गाण्यांचे श्रेय जाते ते ‘सुरज-धीरज’ या नवोदित संगीतकार जोडगोळीला. तरुण, पॅशनेट चित्रपटप्रेमींच्या परिश्रमातून बनलेला ‘जिंदगी विराट’ हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.अनेक कथा, कादंबऱ्यांमधून रंगवला गेलेला बाप हा मुलाच्या सुखासाठी वाट्टेल तो त्याग करणारा नायक असतो अथवा मुलाच्या सुखाच्या आड येणारा व्यसनी खलनायक असतो. परंतु आपण बाप या व्यक्तिरेखेकडे माणूस म्हणून बघायचे विसरतो. या बापाचीही काही स्वप्न असू शकतात, आयुष्याकडून अपेक्षा असू शकतात पण बापाने मुलासाठी त्याग करायचा असतो या गोंडस विचाराच्या नादात ही स्वप्ने, या अपेक्षा विचारात घ्यायला आपण विसरून जातो. ‘जिंदगी विराट’ ही अशाच एका बापाची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या मुलाची गोष्ट आहे. 
 
‘जिंदगी विराट’ या चित्रपटाची कथा महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा अतरंगी गावात घडते. सध्या पितृपक्ष पंधरवडा चालू आहे. या काळात मृतात्म्याला शांती मिळावी म्हणून पिंडाला कावळा शिवणे या विधीला अनन्यसाधारण महत्व आहे. मृत्यूकडे नेहमीच नकारात्मक भावनेने बघितले जाते. परंतु जन्म-मृत्यू आणि त्यासंबंधित मानवी भावभावना अत्यंत तरल पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आल्या आहेत. दिग्दर्शक सुमित संघमित्र यांचा हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटात लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी त्यांनी पेलली आहे. या चित्रपटात मंदार चोळकर आणि सुरज-धीरज यांनी लिहिलेली एका पेक्षा एक सरस अशी तीन भन्नाट गाणी आहेत, जी सुरज-धीरज या जोडगोळीने संगीतबद्ध केली असून चित्रपटाला पार्श्वसंगीतदेखील त्यांनीच दिले आहे. या चित्रपटातील गाण्यांना सोनू निगम, श्रेया घोषाल, विशाल दादलानी, जावेद अली यांसारख्या सुप्रसिद्ध गायकांनी आपला आवाज देऊन चार चाँद लावले आहेत. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मातीपदाची धुरा पद्मिनी सिसोदे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सत्यजीत शोभा श्रीराम यांनी केले असून कुणाल वाळवे यांनी संकलन केले आहे. चित्रपटासाठी उमेश सूर्यवंशी यांनी कलादिग्दर्शन केले असून वेशभूषेची जबाबदारी स्नेहा कुमार यांनी पेलली आहे.ओम भूतकर, सुमित संघमित्र, निनाद गोरे या तरुण कलाकारांची किशोर कदम, अतुल परचुरे, भाऊ कदम, उषा नाईक अशा दिग्गज कलाकारांबरोबर रंगलेली अभिनयाची जुगलबंदी बघायची असेल तर अंजनेय साठे एंटरटेनमेंट निर्मित ‘जिंदगी विराट’ चुकवून चालणार नाही. असा हा जगण्याची बाप गोष्ट सांगणारा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: 'Zinti Virat' made by the filmmaker's youth, will soon be on the screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.