का आहे ‘एक शून्य शून्य’फेम दीपक शिर्के विस्मृतीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 09:47 IST2017-09-14T04:17:54+5:302017-09-14T09:47:54+5:30

स्वतःची ओळख निर्माण करणं, पैसा आणि लोकप्रियता मिळवणे या उद्देशानं कलाकार चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतात. आपली मेहनत, जिद्द आणि त्याला ...

Why is 'zero zero' in Deepak Shirke's forgotten? | का आहे ‘एक शून्य शून्य’फेम दीपक शिर्के विस्मृतीत

का आहे ‘एक शून्य शून्य’फेम दीपक शिर्के विस्मृतीत

वतःची ओळख निर्माण करणं, पैसा आणि लोकप्रियता मिळवणे या उद्देशानं कलाकार चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवतात. आपली मेहनत, जिद्द आणि त्याला मिळालेली नशिबाची साथ याच्या जोरावर कलाकार मंडळी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवतात. रसिकांच्या या प्रेमामुळेच ते प्रसिद्धीच्या शिखरावरही पोहचतात. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना या कलाकार मंडळींचा सर्वत्र उदोउदो असतो. आज मैं ऊपर आसमाँ नीचे अशी काहीशी अवस्था त्यावेळी कलाकारांची असते. चित्रपटसृष्टीतही उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची परंपरा आहे. त्यामुळे या उमेदीच्या काळात कलाकाराला रसिकांच्या प्रेमासह पैसा, प्रसिद्धी आणि सारं काही मिळतं. मात्र हे यश आयुष्यभर टिकवून ठेवणं कठीण असतं. कारण कलाकारांची नवनवीन पीढी समोर येते आणि जुन्या कलाकारांची जागा घेते. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या मोजक्या कलाकारांनाच त्यांना त्यांचं स्थान ध्रुव ता-यासारखं अबाधित ठेवण्यात यश येतं. मात्र काही कलाकार काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. अशाच कलाकारांपैकी एक नाव म्हणजे दीपक शिर्के. आपल्या अभिनयाने एक काळ गाजवणारा हा मराठमोळा अभिनेता चित्रपटसृष्टीसह रसिकांच्या विस्मृतीत गेला आहे की काय अशा चर्चा सध्या सुरु आहेत. ‘एक शून्य शून्य’ या मालिकेतील हवालदार एक शून्य शून्य ही भूमिका आपल्या अभिनयाने गाजवणारे हरहुन्नरी कलाकार म्हणजे दीपक शिर्के. मराठी मालिकेसोबतच 100हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमात दीपक शिर्के यांनी काम केले आहे. धडाकेबाज सिनेमात साकारलेला बाप्पा किंवा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सास-याची भूमिका असो प्रत्येक भूमिकेला दीपक शिर्के यांनी आपल्या अभिनयानं न्याय दिला. दीपक शिर्के यांची खरी चर्चा झाली ती त्यांच्या निगेटिव्ह भूमिकांमुळे. हिंदीमधील दिग्गज कलाकारांसह स्क्रीन शेअर करण्याचा मान दीपक शिर्के यांना मिळाला आहे. या दिग्गज कलाकारांच्या तोडीस तोड अभिनयानं त्यांनी आपली एक वेगळी छाप पाडली. त्यांची प्रत्येक भूमिका आजही रसिकांच्या काळजात घर करुन आहे. 'तिरंगा' सिनेमातील प्रलयनाथ गेंडास्वामी, 'अग्निपथ' सिनेमातील अण्णा शेट्टी यांनी मोठ्या खुबीने रंगवला. बिग बी अमिताभ यांच्यासोबतची अग्निपथ सिनेमातील चिखलातली हाणामारी तर कुणीच विसरु शकत नाही. नव्वदीच्या दशकातील बहुतांशी सिनेमात दीपक शिर्के यांचं दर्शन होतंच. हम, खुदा गवाह, सरकार अशा विविध सिनेमात दीपक शिर्के यांनी बिग बींसह स्क्रीन शेअर केली. यानंतर इश्क, टारझन – द वंडर कार, भाई, लोहा अशा एकाहून एक सरस सिनेमात त्यांनी भूमिका साकारल्या. झपाटलेला-2 सिनेमात हनम्या ही भूमिका त्यांनी साकारली. गेल्या वर्षी 'व्हेंटिलेटर' या सिनेमात आत्मा धाडके ही भूमिका दीपक शिर्के यांनी साकारली होती. मध्यंतरीच्या काळात काही काळ सीआयडी या लोकप्रिय मालिकेत एसीपी प्रद्युम्नच्या जागी त्यांची वर्णी लागली होती. काही बी ग्रेड सिनेमातही त्यांनी काम केलं. इतके वर्ष चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतरही पुरस्कार सोहळे, रिअॅलिटी शोमध्ये दीपक शिर्के पाहायला मिळत नाहीत.कोणत्या कार्यक्रमातील उपस्थिती किंवा त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचं ऐकीवात येत नाही. तसंच त्यांच्या आगामी सिनेमाचीही काहीच चर्चा होताना सध्या दिसत नाही. त्यामुळे चित्रपटसृष्टी लाडक्या एक शून्य शून्य हवालदाराला, सुपरहिट प्रलयनाथ म्हणजेच दीपक शिर्के यांना विसरत तर चालली नाही ना अशा चर्चा सध्या सुरु झाल्या आहेत.    

Web Title: Why is 'zero zero' in Deepak Shirke's forgotten?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.