सिद्धार्थ जाधव का म्हणतोय, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 16:09 IST2018-11-16T16:07:34+5:302018-11-16T16:09:39+5:30
या मनोरंजक चित्रपटात महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, कमलाकर सातपुते यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

सिद्धार्थ जाधव का म्हणतोय, ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’?
तगडी स्टारकास्ट, धम्माल विनोदी आणि भन्नाट मनोरंजन करणारा आगामी मराठी चित्रपट म्हणजे ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’. या चित्रपटाचे शीर्षक आपल्याला नविन नाही, दिवसातून अनेकदा आपण ते ऐकतो. पण, या वाक्याशी निगडीत असलेला चित्रपट पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरणार आहे.
प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोची असून अमोल उतेकर यांनी प्रस्तुत केला आहे. या मनोरंजक चित्रपटात महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, हेमांगी कवी, नीथा शेट्टी-साळवी, कमलाकर सातपुते, माधवी सोमण, प्रियंका मुणगेकर, संध्या कुटे, सतीश आगाशे, शिवाजी रेडकर, हितेश संपत, गौरव मोरे आदी कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
एकंदरीत या चित्रपटाची कथा काय आहे हे लवकरच कळेल. पण चित्रपट आणि प्रेक्षक यांना बांधून ठेवणा-या संगीताचा आज प्रकाशन सोहळा मुंबईत उत्साहात पार पडला. ह्या दिमाखदार सोहळ्याला सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, नीथा शेट्टी, संगीतकार पंकज पडघन, कोरिओग्राफर उमेश जाधव, दिलीप मेस्त्री, एडिटर आशिष म्हात्रे, डिओपी समीर आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
‘दिलाची तार’, गडबडे बाबा, ‘येक नंबर’, ‘तू मोरपंखी’ आणि ‘या रे या रे नाचू सारे’ अशी एकूण पाच गाणी या चित्रपटात आहेत. पंकज पडघन, उद्भव ओझा यांनी या गाण्यांना संगीत दिले आहे तर गायक आदर्श शिंदे, सौरभ साळुंखे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, मधुरा पाटकर, उद्भव ओझा, सागर फडके, अंकिता ब्रम्हे आणि रागिणी कवठेकर यांनी ही गाणी गायली आहेत तसेच गीतकार श्रीकांत बोजेवार, वलय यांनी लिहिली आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद गणेश पंडीत आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहेत.
स्टेलारीया स्टुडियोज प्रस्तुत ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या चित्रपटाची कथा दिग्दर्शक प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असून खुमासदार विनोदामुळे प्रेक्षकांचे पूरेपूरे मनोरंजन करणारा हा चित्रपट ११ जानेवरी २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.