"सूरजला पाहताच लहान मुलगा जागेवरुन उठला अन्..."; चिंचवडला 'झापुक झुपूक'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय घडलं?
By देवेंद्र जाधव | Updated: April 30, 2025 08:44 IST2025-04-30T08:43:58+5:302025-04-30T08:44:25+5:30
'झापुक झुपूक'चा शो चिंचवड येथील एका थिएटरमध्ये सुरु होता. त्यावेळी सूरजने एन्ट्री मारुन सर्व प्रेक्षकांना सरप्राइज केलं. सूरजला पाहताच थिएटरमधील एक लहान मुलगा आणि तरुणीने काय केलं? जाणून घ्या.

"सूरजला पाहताच लहान मुलगा जागेवरुन उठला अन्..."; चिंचवडला 'झापुक झुपूक'च्या स्क्रीनिंगदरम्यान काय घडलं?
सूरज चव्हाणच्या (suraj chavan) 'झापुक झुपूक' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात सूरजने प्रमुख भूमिका साकारली आहे. केदार शिंदेंनी (kedar shinde) या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. सूरजला या सिनेमामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रेम मिळतंय. पण काही लोकांनी सूरजला ट्रोलही केलंय. 'झापुक झुपूक' (zapuk zupuk) सिनेमा काल ९९ रुपयांत अनेक थिएटर्समध्ये बघायला मिळाला. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील अनेक थिएटर्स हाउसफुल्ल होते. अशातच चिंचवड येथील एका सिनेमागृहातील व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सूरज थिएटरमध्ये गेल्यावर लहान मुलाने आणि एका महिलेने काय केलं, हे जाणून घ्या.
सूरज थिएटरमध्ये गेल्यावर काय घडलं?
सूरज काल 'झापुक झुपूक'च्या एका स्क्रीनिंगला उपस्थित होता. त्यावेळी सूरजला पाहताच एक लहान मुलगा त्याच्या खुर्चीवरुन उठला. "मी पहिल्यांदा पिक्चर बघायला आलोय. मी तुम्हाला बिग बॉसमध्ये बघितलंय", असं तो मुलगा आनंदात सूरजला म्हणाला. याच थिएटरमध्ये एका तरुणीच्या डोळ्यात सूरजला पाहून पाणी आलं. सूरजने तिला मिठी मारल्याने थिएटरमध्ये उपस्थित सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अशाप्रकारे सूरजच्या साध्या स्वभावाचं सगळीकडे कौतुक होतंय. पुढे सूरजने थिएटरमध्ये 'झापुक झुपूक' गाण्यावर डान्स केला.
हा व्हिडीओ शेअर करताच सूरजने एका पोस्टच्या माध्यमातून ट्रोलर्सची तोंडं बंद केली. सूरज लिहितो की, "एल्प्रो चिंचवड च्या थेटरात आज आपल्या पिक्चरच्या प्रेक्षकांना भेटायला गेलतो… मला जी नावं ठेवत्यात, आमच्या पिक्चरचे जे नको नको ती वीडियो टाकत्यात त्या पेक्षा जी माझी लोक माझ्यावर प्रेम करत्यात ती माझ्यासाठी लई म्हंजी, लई म्हंजी, लई जास्त महत्वाची ह्यात…! आणि त्यांच्यासाठी मी आविष्यभर मेहनत करणार आणि तुम्हाला मी अविषयभर हसावणार तुमचं प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासोबत असचं राहुद्या - तुमचाच सूरज."