"आम्हाला हिंदू मुस्लिम असं कधीच वाटलं नाही...", अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला बालपणीचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 12:49 IST2025-07-25T12:47:28+5:302025-07-25T12:49:53+5:30
Sankarshan Karahade : अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सोशल मीडियावर अनेकदा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर किंवा त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतो. नुकतेच त्याने एका मुलाखतीत त्याच्या बालपणीचा किस्सा सांगितला आहे.

"आम्हाला हिंदू मुस्लिम असं कधीच वाटलं नाही...", अभिनेता संकर्षण कऱ्हाडेनं सांगितला बालपणीचा किस्सा
संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karahade) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने मालिका, चित्रपट आणि नाटक अशा माध्यमात काम केले आहे. त्याने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तो सोशल मीडियावर अनेकदा आजूबाजूला घडणाऱ्या घटनांवर किंवा त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करत असतो. नुकतेच त्याने एका मुलाखतीत त्याच्या बालपणीचा किस्सा सांगितला आहे.
संकर्षण कऱ्हाडेने नुकतेच आरपार ऑनलाईनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, "आमच्याकडे 'बिस्मिल्ला' नावाच्या भाभी कामाला होत्या. माझ्या आईपेक्षा त्यांचं वय थोडं जास्त असेल. त्यांनी आम्ही तिन्ही भावंडांना पदराखाली घेऊन झोपवलंय त्यांच्या ५ मुलांसह. त्यातल्या अफसरने मला मरता मरता वाचवलंय. तेव्हा तो अफसर ७-८ वर्षांचा होता. आमचं घर २ मजली होतं, पॅराफिट वॉल नव्हती गज सोडतात घरांवरती तसं ते होतं. मी २ वर्षांचा असेल, नुकताच चालायला लागलो होतो. आजी पापड वाळत घालायला गेली होती म्हणून मी गेलो होतो. तेव्हा मी वरून पडलो तर त्या अफसरने धावत येऊन मला झेललं आणि आईकडे देऊन म्हणाला, 'तुम्हारा बच्चा उपर से गिरा , मै पकडा.' "
"तेव्हा आम्हाला हिंदू मुस्लिम असं कधीच वाटलं नाही..."
तो पुढे म्हणाला, "आमच्याकडे कुलधर्म कुलाचार होतो. आपल्याकडे देव देव करतात, सगळ्या माळा, दुर्वा, तांब्याची भांडी ते घासणारी आमची बिस्मिल्ला भाभी होती. ते कोरडे करून मग आम्ही घ्यायचो. मुद्दा असा आहे की मी हे आता सगळं पाहतो तेव्हा मला असं वाटतं की 'आमचं संगोपन आमचं लहानपण तर यांच्याबरोबरच तर गेलंय तेव्हा आम्हाला हिंदू मुस्लिम असं कधीच वाटलं नाही."