तर अशा प्रकारे अश्विनी भावेने अमेरिकेत घराबाहेर साकारली मराठमोळी अंगण संस्कृती !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 15:38 IST2020-04-16T15:24:56+5:302020-04-16T15:38:38+5:30
अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.

तर अशा प्रकारे अश्विनी भावेने अमेरिकेत घराबाहेर साकारली मराठमोळी अंगण संस्कृती !
अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. शहरी भागातून लोप पावत जाणारी हीच मराठी अंगण संस्कृती अभिनेत्री अश्विनी भावे यांनी परदेशात जोपासली आहे. परसातली भाज्या ही पारंपरिक पद्धती त्यांनी अमेरिकेतही जिवंत ठेवली आहे. त्यांचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेत यशस्वीरित्या सुरु आहे. याचा माहिती आपल्या रसिकांना आणि प्रत्येक नागरिकाला कळावी यासाठी अश्विनी भावे यांनी फेसबुकवर द ग्रीन डोअर हा नवा उपक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून त्या आपल्या प्रत्यक्ष जीवनात घरी राबवल्या जाणा-या परसातल्या भाज्या या उपक्रमाची माहिती रसिकांशी शेअर करत असतात.
अश्विनी भावे यांनी अमेरिकेत त्यांच्या घराच्या मागच्या कुंपणामध्ये वेगवेगळी फळं, फुलं आणि भाज्यांची बाग फुलवली आहे. याच भाज्या त्यांच्या स्वयंपाकाचाही भाग असतात. आजच्या पिढीला निसर्गाचं महत्त्व पटवून देण्याच्या उद्देशानं अश्विनी भावे यांनी द ग्रीन डोअर हा उपक्रम सुरु केला आहे. अमेरिकेसारख्या जगातील महासत्ता असलेल्या देशात त्यांनी मोठ्या अभिमानाने आपलं मराठीपण जपलं आहे. या देशात राहूनही अश्विनी भावे यांनी आपल्या घराबाहेर निसर्ग संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबवला आहे. त्याची माहिती त्या फेसबुकच्या माध्यमातून रसिकांशी शेअर करत असतात.
मध्यंतरी बागेत आलेल्या मॅग्नोलिया या सुदंर फुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आपल्या या उपक्रमाचा अश्विनी भावे यांना सार्थ अभिमान आहे. प्रत्येकाची श्रीमंतीची व्याख्या वेगळी असते. ही बागच त्यांच्यासाठी त्यांची श्रीमंती आहे. संस्कृती आणि निसर्ग याचा सुंदर मेळ घालून त्यांनी सातासमुद्रापार अमेरिकेत अनोखा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला रसिकांचाही भरभरुन प्रतिसाद लाभतो आहे. अश्विनी यांनी 'धडाकेबाज', 'अशी ही बनवाबनवी', 'सरकारनामा','कळत नकळत', 'वजीर', 'कदाचित' अशा एकाहून एक सरस मराठी सिनेमात भूमिका साकारल्या आहेत.
याशिवाय ऋषी कपूर यांच्यासह 'हिना' सैनिकमध्ये अभिनेता अक्षय कुमारसह आणि बंधन सिनेमात अभिनेता सलमान खानसह अश्विनी भावे यांनी भूमिका साकारल्या आहेत. मात्र लग्नानंतर अमेरिकेत जाऊनही आपल्या मराठी माती, मराठी संस्कृती, मराठी संस्कार याच्याशी असलेलं नातं न विसरता निसर्ग संवर्धनासाठी झटणा-या या मराठमोळ्या नायिकेचा सा-यांनाच अभिमान असणार.