"अजून एकही दिवस जात नाही तुझ्या आठवणीशिवाय..."; आई माणिक वर्मांसाठी वंदना गुप्तेंची भावुक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 11:24 IST2025-11-10T11:23:54+5:302025-11-10T11:24:50+5:30
माणिक वर्मांची आज पुण्यतिथी. त्यानिमित्त त्यांची मुलगी आणि अभिनेत्री वंदना गुप्तेंनी आईसाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे

"अजून एकही दिवस जात नाही तुझ्या आठवणीशिवाय..."; आई माणिक वर्मांसाठी वंदना गुप्तेंची भावुक पोस्ट
दिग्गज गायिका माणिक वर्मा यांची आज पुण्यतिथी. आपल्या उत्कृष्ट गायनाने माणिक वर्मांनी गेली अनेक वर्ष रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. माणिक वर्मा आज जरी हयात नसल्या तरीही संगीतप्रेमी त्यांना अनोखी स्वरांजली देत असतात. याशिवाय त्यांच्या प्रतिभासंपन्न गायनाची आठवण जागवत असतात. माणिक वर्मांच्या मुली आज अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी खास पोस्ट लिहून आई माणिक वर्मांची आठवण जागवून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
माणिक वर्मांचा फोटो पोस्ट करुन वंदना गुप्ते लिहितात, ''आज १० नोव्हेंबर, ३० वर्षापूर्वी दिवाळीच्या पहाटे तू गेलीस तेव्हा रेडिओवर तुझंच “लाविते मी निरंजन” हे गाणं वाजत होतं. अजून एकही दिवस जात नाही तुझ्या आठवणीशिवाय.. तुझं संगीत, तुझी शालीनता, सोज्वळ माणिक स्वर आताही लोकांच्या मनात, कानात तितकाच आनंद देऊन जातो. मम्मी हे तुझं जन्म शताब्दी वर्ष, आम्ही मुली आमच्या परीनं साजरा करायचा प्रयत्न करतोय. तू आणि पप्पा जोडीनं त्याचा आनंद घेत असालच..''
''तुमच्या आशीर्वादांनी सगळे कार्यक्रम अतिशय सुरेल पणे पार पडत आहेत. लोकांचं तुझ्या विषयीच प्रेम आणि आदर किती अपार आहे हे पावलोपावली दिसून येतं. ते मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी तू किती श्रम केले ते आम्ही पाहिलेत . तुझ्यासारख जगण्याचा प्रयत्न करत राहू. तुझे आशीर्वाद आहेतच.. तुझ्यासारखी फक्त तूच, पुढचा जन्म तुझ्याच पोटी... तुझीच, वंदना.'', अशाप्रकारे खास पोस्ट लिहून वंदना गुप्तेंनी माणिक वर्मांची आठवण जागवली आहे. वंदना गुप्ते, भारती आचरेकर, राणी वर्मा या माणिक वर्मांच्या लेकी त्यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करताना दिसतात.