प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहाल?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 11:21 IST2025-10-28T11:20:18+5:302025-10-28T11:21:58+5:30
प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे.

प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' ओटीटीवर प्रदर्शित, कुठे पाहाल?
Bin Lagnachi Goshta Ott Release: प्रिया बापट आणि उमेश कामत ही मराठी मनोरंजन विश्वातील एक आवडती जोडी आहे. या दोघांनी अनेक मालिका, चित्रपट, नाटक ते ओटीटी प्लॅटफॉर्मवर या खऱ्या आयुष्यातील कपलने विविध प्रोजेक्ट एकत्र केले आहेत. मात्र, जवळपास १२ वर्षांपासून ते कोणत्याही सिनेमात एकत्र दिसले नव्हते. अखेर चाहत्यांची ही इच्छा पुर्ण करत 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट घेऊन ते प्रेक्षकांच्या भेटीला आले. प्रिया आणि उमेशच्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. थिएटर गाजवल्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखल झाला आहे.
प्रिया आणि उमेशचा 'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर आता तो तुम्ही घरबसल्या पाहू शकता. हा चित्रपट जगभरातील प्रेक्षकांसाठी Amazon Prime Video या आघाडीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्यासोबतच या चित्रपटात डॉ. गिरीश ओक, निवेदिता सराफ, सुकन्या मोने आणि संजय मोने यांसारख्या अनुभवी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले आहे, तर याची कथा डॉ. समीर वसंत कुलकर्णी यांची आहे.
काय आहे
चित्रपटाची गोष्ट?
'बिन लग्नाची गोष्ट' हा चित्रपट लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या मनोरंजनात्मकरित्या मांडतो. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्याच्या जीवनातील गमतीजमती आणि त्यांना येणाऱ्या अडचणी विनोदी तसेच भावनिक पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत. लिव्ह-इनमध्ये राहात असलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात लग्नाआधीच गरोदरपणाचे वळण येते आणि त्यात एक अनपेक्षित द्विस्टही दिसतो. याचबरोबर गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांचे नातेही पारंपरिक चौकटींपेक्षा काहीसे वेगळे असल्याचे दिसत आहे. जगात सर्वात शेवटपर्यंत राहणारा कोणता आजार असेल तर तो आहे 'एकटेपणा'. तसंच नात्यातील पोकळी भरुन काढण्यासाठी एकमेकांचा सहवास किती आवश्यक आहे, हे या सिनेमातून सांगण्यात येतं.