लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच प्रेग्नंसी, प्रिया बापट-उमेश कामतच्या 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 15:18 IST2025-08-11T15:16:33+5:302025-08-11T15:18:00+5:30
उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जबरदस्त केमिस्ट्री, निवेदिता सराफ अन् गिरीश ओक यांचंही सरप्राईज

लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच प्रेग्नंसी, प्रिया बापट-उमेश कामतच्या 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर रिलीज
नात्यांच्या पारंपरिक चौकटींना धक्का देणारा आणि एक नव्या विचारांची झलक दाखवणारा ‘बिन लग्नाची गोष्ट’ (Bin Lagnachi Goshta) या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा टीझर लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आधुनिक संकल्पनेवर आधारित असून, नात्यांची नवीन व्याख्या मनोरंजनात्मकरित्या मांडतो. रिअल लाईफ कपल उमेश कामत (Umesh Kamat) आणि प्रिया बापट (Priya Bapat) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
चित्रपटाच्या टीझरमध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. लिव्ह-इनमध्ये राहात असलेल्या या जोडप्याच्या आयुष्यात लग्नाआधीच गरोदरपणाचे वळण येते आणि त्यात एक अनपेक्षित ट्विस्टही दिसतो. याचबरोबर गिरीश ओक आणि निवेदिता सराफ यांचे नातेही पारंपरिक चौकटींपेक्षा काहीसे वेगळे असल्याचे दिसत आहे.
दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात,“प्रेक्षकांकडून टीझरला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट एक वेगळी संकल्पना घेऊन येतोय आणि त्यात नात्यांचा भावनिक प्रवास उलगडतो. उमेश आणि प्रिया यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे ही कथा अधिक वास्तवदर्शी वाटते.”
निर्माते नितीन वैद्य म्हणतात, “चित्रपटाची गोष्ट हटके असली तरी ती आपलेपणाची भावना देणारी आहे. निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांसारखे अनुभवी कलाकार या कथेला अधिक भावनिक खोली प्रदान करतात. प्रेक्षकांना हा चित्रपट नक्कीच भावेल, असा विश्वास वाटतो.”
‘बिन लग्नाची गोष्ट’ हे चित्रपट गॉडगिफ्ट एंटरटेन्टमेंट प्रा. लि. आणि एस. एन. प्रॉडक्शन्स यांनी निर्मित केला असून, तेजश्री अडिगे आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन प्रस्तुत आहे. या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कथा समीर कुलकर्णी यांची असून, दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे आहे. १२ सप्टेंबर रोजी सिनेमा रिलीज होणार आहे.