"मूर्ती लहान, पण किर्ती महान!", नित्यश्री ज्ञानलक्ष्मीनं केलं 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'मधील लाडक्या 'लेकी'चं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 11:50 IST2025-11-06T11:49:53+5:302025-11-06T11:50:47+5:30
Nityashree Dnyanlaxmi : अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी हिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात तिने 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात तिच्या लेकीची भूमिका साकारणारी बालकलाकार त्रिशा ठोसर हिचे कौतुक केलं.

"मूर्ती लहान, पण किर्ती महान!", नित्यश्री ज्ञानलक्ष्मीनं केलं 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'मधील लाडक्या 'लेकी'चं कौतुक
बहुप्रतिक्षित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा अखेर ३१ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. महेश मांजरेकरांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमातून शेतकरी आत्महत्यासारख्या गंभीर विषयावर भाष्य करण्यात आलं आहे. या सिनेमात अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मीने एकनाथच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. दरम्यान आता तिने या चित्रपटात तिच्या लेकीची भूमिका साकारणारी बालकलाकार त्रिशा ठोसर हिची कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेत्री नित्यश्री ज्ञानलक्ष्मी हिने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात तिने 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमात तिच्या लेकीची भूमिका साकारणारी बालकलाकार त्रिशा ठोसर हिचे कौतुक केलं. तिने लिहिले की, ''सिनेमाच्या सेटवर सुरू झालेला प्रवास इथवर कसा घेऊन आला हे कळलंच नाही..पडद्यावर आई म्हणून माझा पदर धरणारी माझी लेक खऱ्या आयुष्यात माऊ म्हणत हट्ट करू लागली..बाळा आज जग तुझं कौतुक करतंय..आणि तू त्यास पात्र देखील आहेस..मी तुला कायम प्रेमाने म्हणते ना,"मूर्ती लहान,पण किर्ती महान!!! कारण ते तंतोतंत खरं आहे..तुला काही गोष्टी शिकवता शिकवता तुझ्याकडून बर्याच गोष्टी मी स्वतः शिकलेय..''
तिने पुढे लिहिले की, ''आपल्या कामावर नितांत प्रेम असणारी तू आपल्या कामात किती प्रामाणिक आहेस हे मीच काय सगळ्यांनी पाहिलंय..अवघ्या सहाव्या वर्षी तुझा स्क्रीनवर असणारा सहज वावर तुझ्या आणखी प्रेमात पाडतो..तुझे कष्ट,मेहनत आणि सातत्य पाहून तुझ्याबद्दल खूप आदर आणि हेवा वाटतो..तुझ्या संस्कारांची शिदोरी सतत सोबत बाळगत तू थोरामोठ्यांशी आदराने आणि नम्रपणे वागतेस..आणि क्षणात समोरच्याला आपलंसं करून घेतेस..जेव्हा जेव्हा लोक तुझ्या कामाचं कोडकौतुक करतात, तुला पाहून तुझ्या अवतीभवती गर्दी करतात त्या प्रत्येक क्षणी ऊर भरून येतो..आणि तू कितीही दमलेली असलीस तरी आपल्या मायबाप प्रेक्षकांना किती हसतखेळत भेटतेस..राज्यशासनाचा आणि त्या पाठोपाठ राष्ट्रीय पुरस्कार मिळून देखील तुझं आणि जमिनीचं नातं सैल झालं नाही, आणि ते कधी होणार देखील नाही हा विश्वास आहे मला तुझ्यावर..जशी आहेस तशीच रहा पिल्लू!! आता कुठे प्रवास सुरू झालाय..अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे..''
''स्वामी तुझ्या सगळया इच्छा, आकांक्षा, आणि स्वप्ने पूर्ण करो..आपलं माऊ आणि चिऊ चं नातं कायम असंच वृद्धिंगत होवो,ही देवाकडे प्रार्थना!! तुला जे हवं ते सगळं मिळो आणि जे तुझं आहे ते कायम तुझंच राहो!!! खूप प्रेम आणि खूप आशीर्वाद बाळा.'', असे तिने पोस्टमध्ये लिहिलंय.