राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 13:48 IST2025-07-12T13:47:46+5:302025-07-12T13:48:05+5:30
तेजस्विनी म्हणाली, "मी राज ठाकरेंशी अनेकदा बोलले तेव्हा..."

राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
अभिनेत्री तेजस्विनी पंडित (Tejaswini Pandit) सध्या राजकारणावर मत मांडताना दिसते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत (Raj Thackeray)अनेकदा ती चर्चा करताना दिसली आहे. त्यांच्यासोबत तिने फोटो शेअर केले आहेत. राज ठाकरेंचे विचार तिला मनापासून आवडतात आणि पटतात असं ती अनेकदा म्हणाली. नुकतंच राज-उद्धव यांच्या विजयी मेळाव्याला तेजस्विनी पंडितनेही हजेरी लावली होती. राज ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छाही तिने व्यक्त केली होती. आता नुकतंच तिने पुन्हा एकदा राजकारणावर भाष्य केलं आहे.
'अजब गजब'ला दिलेल्या मुलाखतीत तेजस्विनी पंडित म्हणाली, "खूप भारी असेल. कारण त्यांचं व्हिजन खूप छान आहे. मी त्यांच्याशी जेव्हा जेव्हा बोलली आहे तेव्हा त्यांच्या बोलण्यातूनच जाणवतं की तो माणूस महाराष्ट्राला सर्वात वरती ठेवतो. कुटुंबापेक्षाही वर ठेवतो. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. असे आपल्याकडे खूप कमी राजकारणी आहेत. नितीन गडकरी मस्त बोलतात. शरद पवार सुद्धा...कधी कधी वाटतं त्यांच्या मेंदूचा अभ्यास केला पाहिजे. इतके ते हुशार आहेत. विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे काय भाषणं करायचे. पूर्वीचे राजकारणी माणसं खूप वेगळी होती आणि तेव्हाचं राजकारणही वेगळं होतं. नैतिकता होती. ग्रेस होता, पॉवर होती. आता सगळं बिघडल्यासारखं वाटतं."
तूही राजकारणात येणार का?
माझा राजकारणाविषयी खूप अभ्यास आहे असं नाही. पण मी खूप आधीपासून फॉलो केलं आहे. त्यामुळे मी कदाचित त्याविषयी बोलू शकते, मला त्यातला फरक कळतोय म्हणून बोलू शकते. मला सगळ्या बाबतीत सगळं माहित असतं असं नाही पण ज्याबद्दल माहित असतं त्यावर मी बोलते. मला पटलेल्या गोष्टी असतात त्याबाजूने मी उभी राहते. समाजकारण करण्यासाठी राजकारणातच यावं लागतं असं नाही. पण नक्कीच लोकांनी याकडे करइरची संधी म्हणूनही बघितलं पाहिजे. मी सध्या अभिनेत्री म्हणून खूप खूश आहे. मला याव्यतिरिक्त काही येईल असं मला वाटत नाही. आमचं क्षेत्र आणि राजकारण दोन्ही क्षेत्र अवघड आहेत. त्यामुळे आधीच एका अवघड क्षेत्रात काम करत असताना मी अजून दुसऱ्या अवघड क्षेत्रात सध्या जाणार नाही."