ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीच्या बाबतीत स्वप्नील जोशीनं घेतला मोठा निर्णय, म्हणाला - "माणूस म्हणून मी तो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 14:18 IST2025-07-24T14:17:21+5:302025-07-24T14:18:10+5:30
Swapnil Joshi : नुकताच स्वप्नील जोशी धाराशिवमध्ये गेला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्याला या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्याने ५ वर्षांपूर्वी आपण जंगली रम्मीची जाहिरात केली होती. आता, आपण ती थांबवली असल्याचे सांगितले.

ऑनलाईन जुगाराच्या जाहिरातीच्या बाबतीत स्वप्नील जोशीनं घेतला मोठा निर्णय, म्हणाला - "माणूस म्हणून मी तो..."
स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. काही दिवसांपूर्वी धाराशिवमध्ये ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेलेल्या एका तरुणाने स्वतःसह कुटुंबाला संपवले होते. नुकताच स्वप्नील जोशी धाराशिवमध्ये गेला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्याला या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्याने ५ वर्षांपूर्वी आपण जंगली रम्मीची जाहिरात केली होती. आता, आपण ती थांबवली असल्याचे सांगितले.
स्वप्नील जोशी म्हणाला, ५ वर्षांपूर्वी आपण जंगली रम्मीची जाहिरात केली होती. आता आपण ती थांबवली आहे, यापुढे ती जाहिरात करणार नाही. मराठी कलाकार म्हणण्यापेक्षा मी अगोदर मराठी माणूस आहे, माणूस म्हणून मी तो निर्णय घेतला आहे.
धाराशिवमध्ये घडलेली घटना
ऑनलाईन जुगाराच्या आहारी गेलेल्या तरुणाने धाराशिव जिल्ह्यातील बावीमध्ये अडीच वर्षाच्या कोवळ्या मुलासह पत्नीला विष पाजून संपवल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर त्याने स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
स्वप्नील जोशी वर्कफ्रंट
स्वप्नील जोशी नुकताच सुशीला सुजीत या सिनेमात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटाच्या निमित्ताने त्या दोघांनी पहिल्यांदाच एकत्र काम केले आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर फारसा प्रतिसाद मिळाला नाही.