स्वप्निल जोशीनं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:10 IST2025-12-05T16:07:37+5:302025-12-05T16:10:10+5:30
स्वप्नीलनं प्रेक्षकांना एक खास सर्प्राइज दिलं आहे.

स्वप्निल जोशीनं घेतला मोठा निर्णय, चाहत्यांना दिली आनंदाची बातमी
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी याचा मोठा चाहता वर्ग आहे. बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केलेल्या स्वप्नीलने आपल्या अभिनयातून अनेक प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. श्रीकृष्ण मालिकेतील श्रीकृष्ण असो किंवा 'दुनियादारी'मधील श्रेयस असो वा 'मुंबई पुणे मुंबई'मधील गौतम असो स्वप्नीलने प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. स्वप्नीलनं आजवर सिनेमा, मालिका, ओटीटी या प्रत्येक माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. पण वर्ष संपताना स्वप्नीलनं प्रेक्षकांना एक खास सर्प्राइज दिलं आहे. ते म्हणजे स्वप्नील जोशी लवकरच एका नव्या कोऱ्या नाटकातून रंगभूमीवर काम करताना दिसणार आहे.
जवळपास दशकभरानंतर स्वप्नील 'लग्न पंचमी' या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण करणार आहे. स्वप्नील जोशी या नाटकासाठी खूप उत्सुक आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरसुद्धा या नाटकात आहे. या नाटकाच्या लिखाणाची जबाबदारी लेखिका मधुगंधा कुलकर्णीने सांभाळली असून, दिग्दर्शन निपुण धर्माधिकारीचे आहे. सध्या तालमी सुरू असून नवीन वर्षाच्या सुरुवातीला हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लग्नातील विरोधाभास, भावना, विनोद आणि नात्यांचा बहुरंगी प्रवास अत्यंत मनमोकळ्या पद्धतीनं मांडणारं हे नाटक आहे.
काल स्वप्नीलनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत केला होता. व्हिडीओमध्ये तो म्हणाला होता, "नमस्कार, खूप दिवसांनी तुमच्याशी असा ऑडिओमधून संवाद साधतोय. मी वयाच्या नवव्या वर्षी काम सुरू केलं. मालिकांमधून काम सुरू झालं. म्हणजे उत्तर रामायण, श्रीकृष्ण या मालिकांमध्ये काम केलं. त्यानंतर 'अमानत', 'देस में निकला होगा चाँद', 'कहता है दिल' यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं. रिअॅलिटी शोमध्येही काम केलं. 'कॉमेडी सर्कस', 'फू बाई फू' सारख्या शोमध्ये काम केलं आणि हा प्रवास असा अविरत सुरू राहिला. उत्तम सुरू आहे. 'दुनियादारी', 'मितवा' ते 'मुंबई पुणे मुंबई', 'वाळवी', 'जिलेबी' अशा अनेक चित्रपटांतही काम केलं. पण, या सगळ्या प्रवासामध्ये मराठी माणूस मराठी कलाकाराला सातत्याने एक प्रश्न विचारतो, जो प्रश्न मलाही माझ्या रसिक प्रेक्षकांनी वारंवार विचारला, विचारत आहेत. मला असं वाटलं की हा प्रश्न रास्त आहे, योग्य आहे. आता बहुतेक त्या प्रश्नाचं उत्तर देण्याची वेळ आली. उत्तर द्यायला लागणार, तुमचाच स्वप्नील". हा ऑडिओ शेअर करत स्वप्नीलने 'मी……बाकी उद्या सांगतो !!!' असं कॅप्शन लिहिलं होतं.
दशकानंतर रंगभूमीकडे वळला
अखेर आज अभिनेत्यानं तो पुन्हा एकदा व्यावसायिक रंगभूमीकडे वळत असल्याची घोषणा केली. "हे केवळ नाटक नसून कलाकार म्हणून स्वतःला पुन्हा नव्यानं घडवण्याचा प्रवास असल्याचं" मुंबई टाइम्सशी बोलताना त्यानं सांगितलं. जवळपास एका दशकानंतर तो परत एकदा नाटकात दिसणार असल्यामुळे चाहत्यांसाठी ती पर्वणी ठरणार आहे. यापूर्वी स्वप्नीलनं चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासोबत 'गेट वेल सून' हे नाटक केलं होतं.