स्वप्नील जोशीच्या पत्नीनं सांगितलं लग्न म्हणजे नेमकं काय? 'ती' पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:28 IST2025-12-17T15:28:13+5:302025-12-17T15:28:46+5:30
स्वप्नील जोशीची पत्नी लीनाने लग्नाच्या नात्यातील वास्तव मांडणारी पोस्ट शेअर केली आहे.

स्वप्नील जोशीच्या पत्नीनं सांगितलं लग्न म्हणजे नेमकं काय? 'ती' पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल!
Swapnil Joshi And Leena Aradhye Wedding Anniversary : स्वप्नील जोशी हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केलेल्या स्वप्नीलने हिंदी कलाविश्वदेखील गाजवलं आहे. स्वप्नीलचा सोशल मीडियावरही भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक कायम उत्सुक असतात. स्वप्नील जोशी आणि त्याची पत्नी लीना जोशी यांच्या लग्नाचा काल वाढदिवस होता. खास दिवशी लीनाने सोशल मीडियावर एक अत्यंत सुंदर पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.
लीनाने स्वप्नीलसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटोंसोबत तिनं लिहलं, "लग्न हे चित्रपटांसारखं नसतं... कॅन्डल लाईट डिनर आणि पावसातले ते परफेक्ट कीस असतात असं नाही. यात बिलं भरणं आहे, कपड्यांच्या घड्या घालणं आहे, ताणतणाव, मुलांचं संगोपन, मूड स्विंग्स, संवादामधला अडथळा आणि थकवणारे काही दिवस असतात. पण... आयुष्य जेव्हा कठीण असतं, तेव्हा कुणीतरी खंबीरपणे तुमच्या पाठीशी असणं, म्हणजे लग्न!".
पुढे तिनं लिहलं, "दिवसभराच्या थकव्यानंतरची मिठी, फक्त दोघांनाच समजणारे विनोद, उशिरापर्यंत चालणाऱ्या गप्पा आणि पुन्हा-पुन्हा एकमेकांचीच निवड करणं, म्हणजे लग्न! कोणतंही लग्न परिपूर्ण नसतं. पण जेव्हा दोन माणसं कठीण काळातही एकत्र राहण्याचं आणि एकमेकांसोबत प्रगती करण्याचं ठरवतात, तेव्हाच खरं प्रेम निर्माण होतं आणि हेच लग्नाला अधिक सुंदर बनवतं".
स्वप्नीलला उद्देशून ती म्हणाली, "माझ्या सोलमेटला... लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी कोणत्याही प्लॅनमध्ये 'मज्जा' आणते, आणि तो माझ्या 'मज्जा'ला शिस्तबद्ध प्लॅनचं रूप देतो. लोक याला 'बॅलन्स' म्हणतात, आणि आम्ही याला 'प्रेम' म्हणतो, असं पोस्टच्या शेवटी तिनं म्हटलं. लीनाने शेअर केलेली ही पोस्ट केवळ रोमँटिक नसून ती लग्नाच्या नात्यातील वास्तव मांडणारी आहे. या पोस्टवर स्वप्नील जोशीने हिंदीमध्ये कमेंट करत लिहलं, "ओहोहोहोओ.... बस कर पगली, रुलाएगी क्या !". चाहत्यांनीही या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव केलाय.
दरम्यान, स्वप्नील जोशीनं दोन लग्नं केली आहेत. त्याच्या पहिल्या बायकोचं नाव अपर्णा होतं. अपर्णा आणि स्वप्नील यांचं कॉलेजमध्ये प्रेम जडलं. त्यानंतर या दोघांनी २००५ मध्ये लग्न केलं. परंतु या दोघांचं लग्न फार काळ टिकलं नाही. चार वर्षांतच त्यांचे मार्ग वेगळे झाले. अपर्णाशी घटस्फोट घेतल्यानंतर स्वप्नीलच्या आयुष्यात लीना आराध्येचा प्रवेश झाला. या दोघांची भेट मुंबईत झाली. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वप्नील आणि लीना यांनी २०११ मध्ये मराठमोळ्या पद्धतीनं लग्न केलं. त्यांना मायरा आणि राघव अशी दोन मुले आहेत. स्वप्नील आणि लीनामध्ये किती चांगलं बॉन्डिंग आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. त्यांचे व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ यांमध्ये त्यांचं हे बॉन्डिंग कळून येतं.