स्वानंदी टिकेकरचं ३ वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर कमबॅक, दिसणार 'सुंदर मी होणार'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 18:48 IST2025-04-28T18:47:52+5:302025-04-28T18:48:36+5:30

Swanandi Tikekar: पु. ल. देशपांडे यांचं ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकात स्वानंदी टिकेकर बेबीराजेची महत्त्वाची भूमिका साकारते आहे. स्वानंदी जवळपास तीन वर्षांनंतर व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत आहे

Swanandi Tikekar makes a comeback to Marathi theatre after 3 years, will be seen in 'Sundar Mee Hoona' | स्वानंदी टिकेकरचं ३ वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर कमबॅक, दिसणार 'सुंदर मी होणार'मध्ये

स्वानंदी टिकेकरचं ३ वर्षांनंतर मराठी रंगभूमीवर कमबॅक, दिसणार 'सुंदर मी होणार'मध्ये

पु. ल. देशपांडे यांचं 'सुंदर मी होणार' (Sundar Mi Honar) हे नाटक तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा रंगभूमीवर दाखल होत आहे. या नाटकात स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) बेबीराजेची महत्त्वाची भूमिका साकारते आहे. स्वानंदी जवळपास तीन वर्षांनंतर व्यावसायिक मराठी रंगभूमीवर पुनरागमन करत आहे. याआधी '१०३', 'डोंट वरी बी हॅपी' सारख्या लोकप्रिय नाटकात झळकलेली ही अभिनेत्री, सध्या हिंदीतील 'महानगर के जुगनू' आणि इंग्रजीत 'मिडल क्लास ड्रिम्स ऑफ समर नाईट' या दोन नाटकांत भूमिका साकारत आहे. मात्र सुंदर मी होणारच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा मराठी रंगभूमीकडे वळली आहे.

''मला निर्माता आकाश भडसावळेचा फोन आला, आणि त्याने विचारलं – नाटक करणार का? त्याचवेळी त्याने या नाटकाचं नाव सांगितलं आणि मला वाटलं, इतकी सुंदर संहिता आणि तेही पुलंचं नाटक – मी नाही म्हणण्याचा विचारच करू शकले नाही,'' असं स्वानंदी सांगते. बेबीराजे ही व्यक्तिरेखा तिच्या अंतर्मनाच्या अगदी जवळची आहे. ही व्यक्तिरेखा थोडीशी बंडखोर, मतस्वातंत्र्य असलेली, आणि आत्मभान जपणारी आहे. ''बेबीराजे नेमकी माझ्यासारखी वाटते. तिची स्वतःची मतं आहेत. ती आपलं काहीतरी वेगळं शोधू पाहते. जे आपल्याला सहज मिळालंय, त्याच्या पलीकडेही काही आहे का, हे शोधणारी ती – म्हणूनच मला ही भूमिका फारच भावली. मी हे नाटक पाहिलं होतं, पण वाचलं नव्हतं. आणि आता पुलंच्या स्वतःच्या हातून लिहिलेल्या ओळी रंगमंचावर बोलता येणार आहेत, ही कल्पनाच खूप पवित्र वाटते,'' असेही स्वानंदी म्हणाली.

राजेश देशपांडे करताहेत दिग्दर्शन

बेबीराजे ही केवळ एका घरातल्या मुलीची गोष्ट नाही – ती नव्या विचारांची, सामाजिक चौकटी मोडण्याच्या प्रयत्नांची गोष्ट आहे. आजची तरुणाई ज्या संघर्षांमधून स्वतःचं वेगळं स्थान शोधते, त्याच दिशेचा प्रवास या व्यक्तिरेखेचा आहे. म्हणूनच ही भूमिका नाकारणं तिच्यासाठी शक्यच नव्हतं. या नाटकाचं दिग्दर्शन अनुभवी दिग्दर्शक राजेश देशपांडे करणार आहेत. देशपांडे यांनी यापूर्वीही पु. ल. देशपांडे यांचं 'ती फुलराणी'चं दिग्दर्शन केलं आहे. त्याचबरोबर भाषाप्रभू वसंत कानेटकर यांचं 'हिमालयाची सावली' याही नाटकांचं दिग्दर्शन करून त्यांनी कानिटकरी भाषेला न्याय दिला आहे. त्यांचा रंगभूमीवरील अनुभव ‘सुंदर मी होणार’च्या नव्या सादरीकरणात मोठा विश्वास निर्माण करतो.

या दिवशी आहे नाटकाचा शुभारंभ

नाटकाची निर्मिती करण देसाई आणि आकाश भडसावळे यांनी केली आहे. नाटकात स्वानंदी (बेबीराजे) सोबत आस्ताद काळे (संजय), श्रुजा प्रभुदेसाई (दीदीराजे) यांसारखे कसलेले कलाकार काम करत आहेत. सृजन देशपांडे, श्रुती पाटील, निलेश दातार ही नट मंडळी साहाय्यक भूमिकांतून दिसणार आहेत. संगीताची जबाबदारी मिलिंद जोशी, नेपथ्य संदेश बेंद्रे, वेशभूषा मंगल केंकरे यांच्याकडे असून, व्यवस्थापनाची धुरा नितीन नाईक यांनी सांभाळली आहे. नाटकाचा शुभारंभ पुलंच्या २५ व्या स्मृतीदिनी म्हणजेच गुरुवार १२ जून २०२५ या दिवशी पुण्यात आणि शुक्रवार १३ जून या दिवशी मुंबईत होणार आहे. 
 

Web Title: Swanandi Tikekar makes a comeback to Marathi theatre after 3 years, will be seen in 'Sundar Mee Hoona'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.