वडील गेल्यानंतर कोणी साथ दिली? मराठी अभिनेता म्हणाला "हक्कानं मागितलं आणि त्यांनी दिलं"
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 16:38 IST2025-05-06T16:38:02+5:302025-05-06T16:38:37+5:30
बापाचं छत्र हरपल्यावर एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे त्याची इच्छा पुर्ण केली, याबद्दल सुशांत शेलारनं सांगितलं.

वडील गेल्यानंतर कोणी साथ दिली? मराठी अभिनेता म्हणाला "हक्कानं मागितलं आणि त्यांनी दिलं"
Sushant Shelar On Eknath Shine: मराठी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीमधील एक नाव म्हणजे सुशांत शेलार. त्याने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच तो बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमध्ये पाहायला मिळाला होता. अशातच आता सुशांत शेलार चर्चेत आला आहे. चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे सुशांंतनं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या अत्यंत भावनिक नात्यावर भाष्य केलंय. बापाचं छत्र हरपल्यावर एकनाथ शिंदे यांनी कशाप्रकारे त्याची इच्छा पुर्ण केली, याबद्दल सुशांत शेलारनं सांगितलं.
सुशांत शेलारनं अलीकडेच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. यावेळी तो म्हणाला, "माझं वयाच्या २६ व्या वर्ष लग्न झालं आणि २७ व्या वर्षी माझे वडिलांचं निधन झालं. त्यानंतर २८ व्या वर्षी मी वडील झालो. त्यानंतर मला कोणाकडे काहीही मागणं माहित नव्हतं. कारण माझ्यावर इतक्या जबाबदाऱ्या होत्या. आई, पत्नी आणि मुलगी यांच्यासाठी माझे प्रयत्न सुरू होते. वडील गेल्यानंतर आयुष्यात कोणाकडे काही मागायचं झालं तर ते मी एकनाथ शिंदे यांच्याकडे हक्काने मागितलं आणि ती जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली. त्यामुळे वडिलांनंतर कुणाकडे काही मागितलं असेल तर ते एकनाथ शिंदे होते. माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली. माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी गोष्ट आहे", अस सुशांत शेलार म्हणाला.
तो म्हणाला, "मला शाळेत असल्यापासूनच नेतृत्व करण्याची खूप हौस होती. त्यामुळे समाजासाठी काहीतरी करता यावं हे मला कायमच वाटायचं. एकनाथ शिंदेंनी माझ्यावर टाकलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे".
याआधी सुशांतनं "इट्स मज्जा"ला दिलेल्या मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं. तो म्हणाला होता, "२००९ मध्ये जेव्हा बाळासाहेबांचा आशिर्वाद घेण्यासाठी मातोश्रीवर गेलो, तेव्हा बाळासाहेबांच्या समक्ष माझी शिंदे यांच्यासोबत ओळख झाली. तो एक योग होता. त्याच्यासोबत जोडला गेलो. शिंदे यांच्यासोबत काम केलं म्हणजे देवासोबत काम केलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना ग्रेट हा शब्दच कमी पडेल. कारण ते स्व:ताला ग्रेट समजत नाहीत. ते अजूनही स्व:ताला कार्यकर्ता समजतात". दरम्यान सुशांत हा एकनाथ शिंदेंच्या शिवसेना गटाचा कार्यकर्ता आहे. शिवसेना सचिव आणि शिव चित्रपट सेना अध्यक्ष ही दोन पदं सध्या तो सांभाळत आहे.