सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' चित्रपटाची पहिली झलक समोर, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2024 18:55 IST2024-10-09T18:54:47+5:302024-10-09T18:55:09+5:30
छोटा पडदा गाजवल्यानंतर आता सूरज मोठा पडदा गाजवायलाही सज्ज झाला आहे.

सूरज चव्हाणच्या 'राजा राणी' चित्रपटाची पहिली झलक समोर, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
Raja Rani Marathi Movie : सध्या सर्वत्र 'बिग बॉस मराठी'ची चर्चा सुरु आहे. यंदाच्या 'बिग बॉस'च्या ट्रॉफीवर गुलिगत किंग सूरज चव्हाणने नाव कोरलं. 'बिग बॉस मराठी' सीझन ५ या पर्वाचे विजेतेपद मिळवल्यानंतर सूरजचं भरभरुन कौतुक करण्यात आलं. छोटा पडदा गाजवल्यानंतर आता सूरज मोठा पडदा गाजवायलाही सज्ज झाला आहे. आई मरिमातेच्या चरणी नतमस्तक होत सूरजने आपल्या आगामी 'राजा राणी' चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे. हा ट्रेलर अनावरण सोहळा सुरजच्या रामती तालुक्यातील मोडवे गावी पार पडला. या ट्रेलर लाँच सोहळ्यात 'बिग बॉस' फेम वैभव चव्हाणने सुद्धा उपस्थिती लावली.
'राजा राणी' या चित्रपटात सूरज चव्हाण महत्त्वाचा भूमिकेत दिसणार आहे. सत्य घटनेवर आधारित उलगडणार्या 'राजा राणी' या प्रेम कथेतून तो महत्वपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात सुरज चव्हाणसह रोहन पाटील,वैष्णवी शिंदे, तानाजी गळगुंडे प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमध्येही नायक नायिकेच्या प्रेमाला एकत्र आणण्यासाठी सूरज महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतोय. ट्रेलरमध्येही त्याचा गुलिगत पॅटर्न पाहणं रंजक ठरतंय.
'सोनाई फिल्म क्रिएशन' प्रस्तुत या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत. तर छायांकन कृष्णा नायकर, एम. बी. अलीकट्टी यांनी केले आहे. सूरजचा चव्हाणचा हा चित्रपट १८ ऑक्टोबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.