'असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही...', मेघा घाडगेनं सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2022 12:38 IST2022-09-09T12:38:27+5:302022-09-09T12:38:54+5:30
Megha Ghadge: प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे.

'असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही...', मेघा घाडगेनं सोशल मीडियावर व्यक्त केला संताप
प्रसिद्ध नृत्यांगना आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मेघा घाडगे (Megha Ghadge) सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला आहे. लावणीच्या नावाखाली एका नर्तकीने अश्लील नृत्य केल्यामुळे मेघा घाडगेने आयोजकांचा चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळतोय. एका फेसबुक पोस्टवरुन मेघा घाडगेने ही माहिती दिली.
एका कार्यक्रमात लावणी सादर करत असताना त्या नर्तकीने गाण्यावर डान्स करत असताना अश्लील कृत्य केले. त्यावेळी स्टेजवर बरीचशी लहान मुलेदेखील उपस्थित होती. हे नृत्य पाहण्यासाठी गर्दी जमली होती. अशा कार्यक्रमात त्या मुलीने केलेले हे अश्लील कृत्य अत्यंत घृणास्पद वाटत असताना कोणीच यावर आक्षेप का घेतला नाही असा संताप मेघा घाडगेने व्यक्त केलाय. आयोजकही अशा नृत्यावर गप्प कसे बसून राहू शकतात? त्या मुलीला देखील लाज कशी काय वाटली नाही?. लाज वाटली पाहिजे या लोकांना जे अशा मुलींना नाचायला बोलावतात. तुमच्या आया बहिणींना असं नाचवाल का? कोणीच कसे बोलले नाही कमाल वाटली मला बघणाऱ्यांची.
मेघा घाडगे त्या मुलीविरोधात पोलीस तक्रार करणार आहे. ती म्हणाली की, एक दोन हजार रूपयांसाठी या मुली इतक्या घाणेरड्या पद्धतीने नाचू शकतात? हा व्हिडीओ पाहून आम्हालाच लाज वाटली. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आया बहिणींना स्टेजवर नाचवाल का? या सर्व पुढच्या पिढीने यातून काय आदर्श घ्यायचा? ह्या गोष्टीवर शांत बसून नाही चालणार लावणीच्या नावाखाली घागरा चोलीवर नाचणं हे असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही कारण यामुळे खूप वाईट परिणाम होत आहे. मी त्या व्हिडीओखाली विरोध दर्शवणाऱ्या कमेंट केल्या मात्र त्यांनी त्या डिलीट केल्या. स्वतःला कार्यकर्ते , राजकारणी समजणारे त्यांनाही याबाबत लाज वाटली पाहिजे, हा कार्यक्रम ज्याने कोणी आयोजित केला आहे. मग तो मोठा कार्यकर्ता असो किंवा नेता असुदे त्याला अशा मुलींना नाचवायला लाज वाटली पाहिजे.
ती पुढे म्हणाली की, मी पण कार्यक्रम करते ठिकठिकाणी आमचे शो होतात पण लावणीच्या नावाखाली असे कृत्य खपवून घेतले जाणार नाही. आज या मुलीने सुरुवात केली उद्या दुसरी मुलगी येऊन असे कृत्य करेल हे खपवून घेतले जाणार नाही. मेघा घाडगे यांचे मत अनेकांना पटले असून तिच्या चाहत्यांनी हा मुद्दा उचलून धरलेला दिसत आहे. त्या व्हिडिओवरून अनेकांनी विरोधी प्रतिक्रिया देत आपला राग व्यक्त केला आहे. परखडपणे तिने मांडलेली बाजू योग्य असल्याचं देखील म्हटलं आहे.