'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण, सुबोध भावे लिहितो- "कल्पना डोक्यात आली आणि बघता बघता..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 15:40 IST2025-11-12T15:37:22+5:302025-11-12T15:40:12+5:30
सुबोध भावेने 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. त्याने खास फोटो शेअर केले आहेत.

'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण, सुबोध भावे लिहितो- "कल्पना डोक्यात आली आणि बघता बघता..."
अभिनेता सुबोध भावे हा मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. अभिनेता म्हणून सुबोध भावेने विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलंय. पण 'कट्यार काळजात घुसली' आणि संगीत मानापमान या दोन सिनेमांमधून सुबोधने दिग्दर्शकीय कमाल दाखवली आहे. आज सुबोधचं पहिलं दिग्दर्शन असलेल्या 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाला १० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सुबोधने लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे
सुबोध भावेने सोशल मीडियावर खास फोटो शेअर करुन पोस्ट लिहिलंय की, "सूर निरागस हो ", १२ नोव्हेंबर २०१५ रोजी "कट्यार काळजात घुसली " हा चित्रपट प्रदर्शित झाला. आज त्याला १० वर्षे पूर्ण झाली. राहुल देशपांडे यांनी "कट्यार " नाटकाची निर्मिती केली आणि खरं म्हणजे तिथूनच चित्रपटाची कल्पना डोक्यात आली आणि बघता बघता सगळ्यांच्या साथीने तो पूर्ण झाला. हा चित्रपट म्हणजे भारतीय संगीताचा सोहोळा, माणसाला माणसाशी जोडणारा, नव्या पिढीची आपल्या आधीच्या पिढीशी नाळ जोडणारा.''
''आमच्या संपूर्ण संघासाठी हा आयुष्यभराच्या आनंदाचा सोहळा. पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर ,प्रभाकर पणशीकर, पंडित.जितेंद्र अभिषेकी ,पंडित. वसंतराव देशपांडे यांची ही जादूची मैफिल आम्हाला सर्वाना पुढील पिढीपर्यंत पोहोचती करता आली हे आमचं भाग्य. या प्रवासात सामील असलेल्या प्रत्येकाच्या आयुष्यभर ऋणात. आणि तुम्ही सर्व रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं, आशिर्वाद दिले, तुम्हा सर्वावर नितांत प्रेम. जीते रहो गाते रहो.'' , अशाप्रकारे सुबोधने 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाची खास आठवण जागवली आहे.