"अपमान केल्यास उत्तरही त्याच भाषेत मिळेल" सुबोध भावेची मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 15:48 IST2025-07-11T15:43:07+5:302025-07-11T15:48:00+5:30
मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी हिंदी-मराठी वादावर ठाम मत मांडलं.

"अपमान केल्यास उत्तरही त्याच भाषेत मिळेल" सुबोध भावेची मराठी-हिंदी वादावर प्रतिक्रिया
महाराष्ट्रात सध्या हिंदी-मराठी भाषा वाद हा मुद्दा चर्चेत आहे. त्यावर कलाविश्वातूनही अनेक कलाकार मंडळींनी त्यांच्या प्रितिक्रिया दिल्या आहेत. बऱ्यापैकी सर्व कलाकारांनी महाराष्ट्रात मराठीच याला दुजोरा दिलेला पाहायला मिळतं. अशातच मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave) मराठी-हिंदी भाषा वादावर आपली ठाम भूमिका मांडली.
नुकतंच सुबोध भावेनं 'फिल्मीबीट प्राइम'शी संवाद साधला आहे. त्यामध्ये त्याला राज्यात सुरू असलेल्या मराठी-हिंदी वादाबद्दल विचारण्यात आलं. सुबोध त्यावर म्हणाला,"महाराष्ट्रात येऊन तुम्ही आम्हाला 'हिंदी बोला मराठी नाही' असं म्हणायचं नाही, ते उत्तर प्रदेशात. जेव्हा आम्ही तिकडे येऊ, तेव्हा आम्ही तुमच्याशी मराठीत नाही तर हिंदीमध्येच बोलू. कारण, तुम्हाला हिंदी समजते. पण, तुम्ही महाराष्ट्रात येऊन 'हिंदीत बोला मराठी कळत नाही', असं तोऱ्यात ऐकवू नका. तर हा एक अपमान आहे. सन्मान तेव्हाच होतो, जेव्हा कोणी म्हणतं 'मला मराठी येत नाही, कृपया शिकवा'. तर आम्ही शिकवू. पण जर तुम्ही अपमान केलात, तर मग उत्तरही त्याच भाषेत मिळेल".
पुढे तो म्हणाला, "भारतामधील प्रत्येक भाषा ही खूप प्रेमळ आहेत. जेव्हा हिंदी अमिताभ बच्चन, आशुतोष राणा किंवा अटल बिहारी वाजपेयी यांच्या तोंडून ऐकतो, तेव्हा ती हिंदी खूप छान वाटते. ऐकत राहावी वाटते. जेवढा गोडवा बंगाली भाषेत आहे, तेवढाच गोडवा गुजराती, तेलगु, मारवाडी, कन्नड, मराठी आणि हिंदीमध्ये आहे. तुम्ही एकच भाषा घेऊन बसलात, असं कसं चालेल", असं त्यानं म्हटलं.
सुबोध भावे त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. मराठी मालिका, सिनेमा, हिंदी सिनेमा, वेबसीरिजमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. अनेक वर्षांपासून तो विविधांगी भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. सध्या त्याच्या आगामी 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेची चर्चा आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्यासोबत दिसणार आहे. या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत.