"स्मृतीला तिचं आयुष्य जगू द्या" सलील कुलकर्णींनी नेटकऱ्यांना झापलं, म्हणाले "आपल्या घरातील मुलगी असती तर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:26 IST2025-11-26T10:25:52+5:302025-11-26T10:26:42+5:30
लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी यांनी नेटकऱ्यांच्या वागणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

"स्मृतीला तिचं आयुष्य जगू द्या" सलील कुलकर्णींनी नेटकऱ्यांना झापलं, म्हणाले "आपल्या घरातील मुलगी असती तर..."
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार-चित्रपट निर्माता पलाश मुच्छल यांच्या लग्नाच्या दिवशी स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे हा विवाह समारंभ अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला. यानंतर स्मृतीने तिच्या साखरपुड्याची घोषणा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवला. तसेच इंस्टाग्रामवरून लग्नाशी संबंधित इतर सर्व पोस्ट देखील डिलीट केल्या. स्मृतीने उचललेल्या या मोठ्या पावलामुळे दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर आला आहे. याच पार्श्वभूमीवर, लोकप्रिय गायक सलील कुलकर्णी यांनी स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्यावर होणाऱ्या या चर्चांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. "हे सगळं करून काय साध्य होणार आहे?" असा परखड सवाल त्यांनी नेटकऱ्यांना केला.
सलील कुलकर्णी यांनी एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहलं, "कृपया... सुपर टॅलेंटेड क्रिकेटपटू स्मृतीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चा करणं थांबवा... तिला तिचं आयुष्य जगू द्या. आपल्यालाच इतरांपेक्षा जास्त माहिती आहे, हे जगाला दाखवण्याची एवढी घाई का आहे? थोडे विचारशील व्हा", अशी विनंती त्यांनी नेटकऱ्यांना केली.
व्हिडीओमध्ये बोलताना त्यांनी थेट प्रश्न विचारत नेटकऱ्यांच्या वागणुकीवर बोट ठेवले. ते म्हणाले, "मित्रांनो आपण असे का वागतो? स्मृती मानधनाच्या आयुष्यात जे काही झालं असेल, ते ती बघेल... तिच्या जवळची लोक बघतील. आपल्या घरातील मुलगी असती किंवा बहीण असती तर आपण असं बोललो असतो का?".
सलील यांनी पुढे बोलताना, 'सर्वांपेक्षा जास्त आपल्याला माहितीये' हे दाखवण्याची लोकांना असलेली घाई चुकीची असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "सर्वांपेक्षा आपल्याला जास्त माहितीये, सर्वांच्या आधी आपल्याला माहितेय. हे सांगण्याची ऐवढी हौस का आहे. कुणाच्या मृत्यूच्या बाबतीत असो किंवा इतर कोणत्या बाबतीत. माहिती नसताना वाढवून सांगण्याची एवढी घाई का? आपण थोडं समजूतदारपणे वागलं पाहिजे. आपल्या घरचं कोणी असतं तर आपण असं नसतं केलं. बरं या गोष्टी तुम्हाला आधी समजल्याही तर असं काय साध्य होणारे? जरा आप-आपलं बघुयात ना", असे म्हणत त्यांनी या अनावश्यक चर्चांना पूर्णविराम देण्याचे आवाहन केले आहे.