"खूप प्रेम महेश सर..." मांजरेकरांसाठी सिद्धार्थ जाधवची भावनिक पोस्ट, म्हणाला "माझ्या आयुष्यातील 'देवमाणूस'"
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 10:00 IST2025-11-02T09:57:41+5:302025-11-02T10:00:15+5:30
सिद्धार्थ जाधवने महेश मांजरेकरांना म्हटले 'देवमाणूस'; भावनिक पोस्ट व्हायरल!

"खूप प्रेम महेश सर..." मांजरेकरांसाठी सिद्धार्थ जाधवची भावनिक पोस्ट, म्हणाला "माझ्या आयुष्यातील 'देवमाणूस'"
महेश मांजरेकर दिग्दर्शित 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधव महत्वाच्या भूमिकेत दिसला आहे. चित्रपटातील त्याच्या पात्राला प्रेक्षकांकडून मिळत असलेलं प्रेम पाहून सिद्धार्थ भारावला. त्यानं ते पात्र साकरण्याची संधी देणाऱ्या महेश मांजरेकर यांच्यासाठी एक अत्यंत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. सिद्धार्थने ही पोस्ट करत मांजरेकरांचे खास आभार मानले आहेत.सिद्धार्थने 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटातील आपल्या 'उस्मान खिल्लारी' भूमिकेचा खास उल्लेख केला आहे. ही भूमिका आव्हानात्मक होती, पण मांजरेकरांच्या मार्गदर्शनामुळेच तो त्या भूमिकेला न्याय देऊ शकल्याचं त्यानं म्हटलं.
सिद्धार्थ जाधवने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये महेश मांजरेकरांना 'देवमाणूस' असे संबोधले आहे. सिद्धार्थने लिहिले, "महेश सर तुमच्यासाठी काय लिहावं हेच कळत नाहीये. तुम्ही केवळ एक दिग्दर्शक नाही, तर माझ्या आयुष्यातील 'देवमाणूस' आहात. तुमच्यासोबत काम करताना एक 'अभिनेता' म्हणून सिद्ध करण्याची संधी देता. 'दे धक्का' पासून सुरू झालेला हा प्रवास 'लालबाग परळ' 'शिक्षणाच्या आईचा घो' 'कुटुंब' ते आजच्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले'पर्यंत...".
सिद्धार्थने कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, "तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्यामुळेच मी माझ्या कामातून वेगवेगळ्या भूमिका साकारू शकलो. तुमच्या मार्गदर्शनामुळेच मी उस्मान खिल्लारी सारख्या एका आव्हानात्मक भूमिकेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. त्या भूमिकेला आणि सिनेमाला आज खूप प्रेम मिळतंय. सर, तुमचा प्रत्येक शब्द आणि प्रत्येक निर्णय माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. खूप प्रेम सर... तुमचाच... सिद्धार्थ जाधव", या शब्दात अभिनेत्यानं आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' काल प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ बोडके प्रमुख भूमिकेत आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप हे बालकलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटात सयाजी शिंदे, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, मंगेश देसाई, शशांक शेंडे हे कलाकारदेखील महत्वाच्या भूमिकेत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती प्रखरपणे मांडणारा हा चित्रपट आहे.