सिद्धार्थ जाधवने सांगितला बारावीच्या परिक्षेचा भन्नाट किस्सा, परीक्षा एका विषयाची अन् अभ्यास केला दुसऱ्याच विषयाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 14:40 IST2025-05-05T14:39:40+5:302025-05-05T14:40:09+5:30
सिद्धूनं एका मुलाखतीत आपल्या बारावीच्या परीक्षेशी संबंधित मजेदार किस्सा शेअर केला आहे, जो ऐकून कुणालाही हसू आवरणं कठीण जाईल.

सिद्धार्थ जाधवने सांगितला बारावीच्या परिक्षेचा भन्नाट किस्सा, परीक्षा एका विषयाची अन् अभ्यास केला दुसऱ्याच विषयाचा!
Siddharth Jadhav 12th Standard Exam Funny Story: आपला सिद्धू' म्हणून लोकप्रिय असणारा सिद्धार्थ जाधव हा चित्रपट, मालिका आणि नाट्य क्षेत्रातील एक बहुमुखी कलाकार आहे. कॉमेडी किंग म्हणून सिद्धार्थने खास ओळख मिळवली आहे. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत त्यानं वेगळ स्थान निर्माण केलंय. कधी आपल्या विनोदी अभिनयामुळे तर कधी त्याच्या खास किस्स्यांमुळे सिद्धू नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. अशातच सिद्धूनं एका मुलाखतीत आपल्या बारावीच्या परीक्षेशी संबंधित मजेदार किस्सा शेअर केला आहे, जो ऐकून कुणालाही हसू आवरणं कठीण जाईल.
सिद्धार्थ जाधवनं नुकतंच न्यूज १८ लोकमत मुलाखत दिली. यावेळी सिद्धार्थने सांगितलं की, बारावीच्या परीक्षेच्या दिवशी त्याने पूर्ण रात्रभर इतिहासाचा अभ्यास केला होता. पण, प्रत्यक्ष परीक्षा मात्र इकॉनॉमिक्स या विषयाची होती. पण, हा प्रकार लक्षात येताच त्याचा अक्षरशः गोंधळ उडाला होता. सिद्धार्थ म्हणतो, "ईकोच्या पेपरवेळी इतिहासाचा अभ्यास करून गेलेलो. पेपर दुपारी तीनचा होता आणि मी सकाळी अकरालाच परीक्षा केंद्राबाहेर पोहोचलो होतो. तेव्हा लक्षात आलं की पेपर इतिहासाचा नसून इकॉनॉमिक्सचा आहे. लगेच मी माझा मित्र निखिल राजशिर्के, जो आज हायकोर्टात वकील आहे, त्याला फोन केला. तो दादरला राहायचा. त्याच्याकडे गेलो, त्याने मला तातडीनं इकॉनॉमिक्सचं ऑब्जेक्टिव्ह शिकवलं".
पुढे सिद्धार्थनं सांगितलं, "तीन तास मी बसून राहिलो, उठलो नाही. पेपर लिहून झाल्यावर मी प्रभू देवाचं चित्र काढत बसलो. त्या पेपरमध्ये मला 35 मार्क मिळाले आणि मी पास झालो". सिद्धार्थचा हा किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना त्याची विनोदी शैली आणि सत्य परिस्थितीवर आधारित किस्से फारच भावत आहेत.
सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो आता थांबायचं नाय या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. हा चित्रपट १ मे २०२५ या दिवशी प्रदर्शित झाला आहे. यामध्ये सिद्धार्थ जाधवसह भरत जाधव, आशुतोष गोवारीकर, सिद्धार्थ जाधव, प्राजक्ता हनमघर, किरण खोजे, प्रवीणकुमार डाळिंबकर, ओम भुतकर, पर्ण पेठे, श्रीकांत यादव आणि रोहिणी हट्टंगडी यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. झी स्टुडिओज् प्रस्तुत , झी स्टुडिओज्, चॉक अँड चीज फिल्म्स आणि फिल्म जॅझ निर्मित ‘आता थांबायचं नाय’ या चित्रपटाचे लेखन ओमकार गोखले,अरविंद जगताप आणि शिवराज वायचळ यांनी केले आहे.