VIDEO : वाढदिवशी श्रेयस तळपदेनं चाहत्यांना दिलं भन्नाट रिटर्न गिफ्ट, लवकरच येणार नवा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 14:36 IST2022-01-27T14:35:51+5:302022-01-27T14:36:23+5:30
Shreyas Talapade : होय, श्रेयसने वाढदिवसाचं निमित्त साधत त्याच्या नव्या आगामी सिनेमाची घोषणा केलीये. या सिनेमात तो अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत झळकणार आहे.

VIDEO : वाढदिवशी श्रेयस तळपदेनं चाहत्यांना दिलं भन्नाट रिटर्न गिफ्ट, लवकरच येणार नवा चित्रपट
हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय श्रेयस तळपदे (Shreyas Talapade) याचा आज वाढदिवस. आज श्रेयस त्याचा 46 वा वाढदिवस साजरा करतोय आणि वाढदिवसाच्या दिवशी अभिनेत्याने चाहत्यांना एक मोठं रिटर्न गिफ्ट दिलं आहे. होय, श्रेयसने वाढदिवसाचं निमित्त साधत त्याच्या नव्या आगामी सिनेमाची घोषणा केलीये. या सिनेमात तो अभिनेत्री मुक्ता बर्वेसोबत (Mukta Barve) झळकणार आहे. ‘आपडी थापडी’ (Aapdi Thaapdi) असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात झाली.
श्रेयस तळपदेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक टीजर शेअर केला आहे. ‘आजच्या दिवशी आपणा सर्वांसाठी एक खास भेट. माझ्याबरोबरच आपले प्रेम आणि आशीर्वाद आमच्या या नवीन बाळालाही लाभो...हीच बाप्पा चरणी प्रार्थना,’ असं लिहित श्रेयसने हा युनिक टीझर शेअर केला आहे.
शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कोणाचाही चेहरा दाखवण्यात आलेला नाही. यामध्ये फक्त हातांपासून बनलेली कलाकृती आणि भिंतीवर पडणारी त्याची सावली दिसते. सोबत श्रेयस, मुक्ता आणि एका छोट्या मुलीचा आवाज ऐकू येतो.
या टीजरमध्ये चिमुकली आणि बाबांचा संवाद ऐकायला येतो. बाबा एक हात वर करा, आता बोटं अशी करा..., असं ती चिमुकली म्हणते. यावर वर, कशी? असं श्रेयस विचारतो. यावर ती म्हणते, अरे तो बुमराह जसा बॉल पकडतो ना तशी..., यावर कसा पकडतो रे बुमºया? अशी, काय करतेस तू काय, असं श्रेयस उच्चारतो. तेव्हा ती चिमुकली बाबांच्या हाताच्या सहाय्याने एक कलाकृती तयार करते आणि दिव्याच्या प्रकाशात भिंतीवर त्याची सावली एखाद्या बकरीसारखी दिसते. बाबा आणि त्याच्या लेकीचा हा गोड संवाद मनाला भावतो. टीझरवरून चित्रपटाची कथा स्पष्ट होत नाही. पण यात एका त्रिकोणी कुटुंबाची कथा पाहायला मिळणार, असं दिसतेय. साहजिकचं चाहते उत्सुक आहेत.