Gen-Z ला शरद पोंक्षे यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले "किती प्रामाणिक राहावे हे ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 18:20 IST2025-12-15T18:20:15+5:302025-12-15T18:20:47+5:30
मराठी रंगभूमीवर एक ऐतिहासिक आणि अजरामर कलाकृती पुन्हा एकदा जिवंत होत आहे.

Gen-Z ला शरद पोंक्षे यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले "किती प्रामाणिक राहावे हे ..."
मराठी रंगभूमीवरील एक अजरामर कलाकृती असलेलं 'हिमालयाची सावली' हे नाटक पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि राजेश देशपांडे दिग्दर्शित या नाटकात समाजासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान व्यक्तीच्या पाठीशी उभ्या राहून आयुष्यभर त्याग करणाऱ्या त्यांच्या पत्नीच्या वेदनांचे चित्रण करण्यात आलं आहे. या नाटकात ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे आणि अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई यांच्या मुख्य भूमिका आहेत. या नाटकाबद्दल बोलताना शरद पोंक्षे यांनी तरुण पीढीला खास दिल्ला दिलाय.
शरद पोंक्षे या नाटकात 'नानासाहेब' ही भूमिका साकारत आहेत. जे आपले जीवन समाजकार्यासाठी समर्पित करतात. शरद पोंक्षे सांगतात, "आज आपण आजूबाजूला जे समाजकारण आणि राजकारण पाहतो, त्यात नानासाहेब हे समाजकारण करणारे आहेत". पोंक्षे यांच्या मते, हे नाटक नानासाहेबांचे नसून, त्यांच्या 'सावली'चे आहे. पुढे शरद पोंक्षे म्हणाले, "आयुष्यात एकतर बायका-मुलांचा तरी संसार करता येतो किंवा समाजाचा तरी प्रपंच करता येतो. या दोघांची मोट बांधू पाहणारे दोन्हीकडे पराभूतच होतात".
पोंक्षे पुढे म्हणतात की, "छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर किंवा महर्षी कर्वे यांसारखे जे 'हिमालय' होऊन गेले, त्यांच्या पत्नींच्या, म्हणजेच त्यांच्या 'सावल्यांच्या' वाट्याला जे भयानक आयुष्य आले, तेच दुःख हे नाटक दर्शवते. म्हणायला मोठ्या माणसाची बायको, पण सुख कितीसं पदरात पडलं? ही माणसं कधी एकाची नव्हतीच. ते समाजाचेच होते. हे नाटक त्याच निस्वार्थी त्यागाची कहाणी सांगणार आहे".
नानासाहेबांच्या 'सावली'ची अत्यंत संवेदनशील भूमिका अभिनेत्री शृजा प्रभूदेसाई यांनी साकारली आहे. अनेक वर्षे आपल्या पतीच्या ध्येयासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणाऱ्या पत्नीची वेदना शृजा यांनी आपल्या अभिनयातून उभी केली आहे. नानासाहेबांच्या महानतेमागे असलेला हा निस्वार्थ त्याग प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणणारा आहे. या नाटकात विघ्नेश जोशी, जयंत घाटे, सृजन देशपांडे, प्राची रिंगे, सोनाली राजे, चैतन्य राव, ओंकार कर्वे आणि विजय मिरगे यांसारख्या कलाकारांचाही समावेश आहे.
दिग्दर्शक राजेश देशपांडे यांनी हे नाटक अतिशय प्रभावीपणे बसवले आहे. शरद पोंक्षे तरुण पिढीला उद्देशून सांगतात की, हे नाटक केवळ मनोरंजन नाही, तर ते 'खऱ्या आयुष्यात हिमालय व्हायला शिकवणारं' आहे. ते म्हणाले, "तुम्ही काम करताना तुमच्या कामाच्या ठिकाणाशी आणि कामाशी किती प्रामाणिक राहावे, किती बांधिलकी पाळावी, हे नाटक शिकवतं".
शरद पोंक्षे यांनी यावेळी स्पष्ट केलं की, "सध्याची जी ५-६ पात्रांची नाटकं येतात, त्यांच्या दोन प्रयोगांचा खर्च म्हणजे 'हिमालयाची सावली' नाटकाच्या एका प्रयोगाचा खर्च आहे". ते प्रेक्षकांना आवाहन करत म्हणाले की, "नाटक, दिग्दर्शन, नेपथ्य आणि अभिनय कसा असावा, हे अनुभवायचे असेल तर 'हिमालयाची सावली'सारख्या खर्चीक आणि दर्जेदार नाटकांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळणे अत्यंत आवश्यक आहे"