"या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच...", निळू फुलेंना आदर्श मानतात सयाजी शिंदे, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 14:04 IST2025-10-24T14:03:35+5:302025-10-24T14:04:12+5:30
मला त्यांना पालखीतूनच घेऊन जायचं होतं... सयाजी शिंदेंनी सांगितली निळू फुलेंची 'ती' आठवण

"या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच...", निळू फुलेंना आदर्श मानतात सयाजी शिंदे, म्हणाले...
मराठी अभिनेते सयाजी शिंदे यांच्या अनेक भूमिका अजरामर आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतही त्यांनी अभिनयाचा डंका गाजवला. सयाची शिंदे यांनी सिनेसृष्टीत आपलं वेगळं आणि अढळ स्थान निर्माण केलं. त्यांच्या खलनायकी भूमिकांनी मोठा पडदा गाजवला. सयाजी शिंदेंनी नुकतंच त्यांचे आदर्श कोण याचा खुलासा केला. दिवंगत अभिनेते निळू फुलेंना ते अक्षरश: देवच मानतात. निळू फुलेंबद्दल नुकतंच ते एका मुलाखतीत भरभरुन बोलले.
अमोल परचुरेंच्या 'कॅचअप'ला दिलेल्या मुलाखतीत सयाजी शिंदे म्हणाले, "नट म्हणून माझ्यासाठी निळू फुले आदर्श आहेत. मी त्यांना म्हटलंही होतं की आमचे बाप कुणीपण असू द्या, पण या क्षेत्रातले आमचे खरे बाप तुम्हीच आहात. तुम्हाला बघून बघून आम्ही मोठे झालो. तुमचा अभिनयातला जो सहजपणा आहे तो आम्ही अजूनही शिकतोय. भूमिका करताना नट अभिनयात एक आविर्भाव आणतो. तो आविर्भाव तुमच्यामध्ये दिसूनच येत नाही. हे शिकण्यातच आमचं आयुष्य चाललंय. त्याच्या जवळ जाण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुमच्याकडून शिकतो, तुमच्या वेगवेगळ्या भूमिका बघतो."
ते पुढे म्हणाले, "त्यांना क्लासिकल गाण्यांची आवड होती. मुद्दाम मला बाजूला बसवून ते मला हे गाणं लाव, ते गाणं ऐकायचंय असं म्हणायचे. त्या माझ्या आयुष्यातल्या आनंदाच्या गोष्टी होत्या. मी त्यांना माझ्या फार्म हाऊसवरही घेऊन गेलो होतो. तेव्हा मला फक्त पालखीच अरेंज करता आली नव्हती. नाहीतर मी त्यांना देवाला घेऊन जातो तसं पालखीच बसवून घेऊन गेले असतो असंच मला करायचं होतं."
सयाजी शिंदे सध्या 'सखाराम बाइंडर' नाटकात दिसत आहे. १९७२ सालचं विजय तेंडुलकर लिखित हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं आहे. या नाटकात सयाजी शिंदे सखाराम या मुख्य भूमिकेत आहेत. हे नाटक माझ्यासाठी एक वेगळा अनुभव आहे असं सांगत, रसिकांना पुर्नप्रत्ययाचा आनंद देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची भावना सयाजी शिंदे यांनी बोलून दाखवली. आजच्या पिढीने हे नाटक पाहिलेले नाही या पिढीलाही हे नाटक या निमित्ताने जाणून घेता येणार आहे.