'सूर सपाटा'मध्ये संजय जाधवचा खलनायकी अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 06:59 PM2019-03-13T18:59:31+5:302019-03-13T19:00:03+5:30

चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बोलती करण्याचे कसब असणाऱ्या संजय जाधवची अभिनयाची इनींग सध्या जोरात आहे.

Sanjay Jadhav's villainous style in 'Sur Sapata' | 'सूर सपाटा'मध्ये संजय जाधवचा खलनायकी अंदाज

'सूर सपाटा'मध्ये संजय जाधवचा खलनायकी अंदाज

googlenewsNext

चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम बोलती करण्याचे कसब असणाऱ्या संजय जाधवची अभिनयाची इनींग सध्या जोरात आहे. अनेक मराठी चित्रपटांना आपल्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये उत्तमरीत्या कॅप्चर करणारे सिनेमॅटोग्राफर, 'दुनियादारी' या मराठी चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्लची यशस्वी मोहोर उमटवणारे दिग्दर्शक, युवा पिढीला आकर्षित करणारी 'दिल दोस्ती दुनियादारी' सारख्या मालिकांचे ट्रेंडसेटर संजय जाधव लाडे ब्रोज् फिल्म्स प्रा. लि निर्मिती संस्थेच्या आणि मंगेश कंठाळे दिग्दर्शित 'सूर सपाटा' या चित्रपटातून पहिल्यांदाच खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'सूर सपाटा' चित्रपट कबड्डी या खेळावर आधारीत आहे. कबड्डीला आज अनन्यसाधारण महत्त्व आले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कबड्डीची दखल घेतली गेलेली आहे. याला अनुसरूनच 'सूर सपाटा'ची कथा मंगेश कंठाळे यांनी बांधली आहे. तर अभिनय जगताप यांचे सुमधूर संगीत या चित्रपटाला लाभले आहे. गावखेड्यातील उनाडटप्पू विद्यार्थी ते साहसी कबड्डीपटू असा रोमांचकारी प्रवास रेखाटणाऱ्या 'सूर सपाटा'मध्ये संजय जाधव एक सरप्राईझ एलिमेंट म्हणून दिसतील. आता पर्यंतच्या त्यांच्या कारकिर्दीत या चित्रपटामध्ये साकारलेली 'कबड्डी प्रशिक्षक शंकर जगदाळे'ची भूमिका प्रेक्षकांना नक्कीच भावेल अशीच आहे. 
 
ईगल आय एंटरटेन्मेन्टचे प्रकाश नाथन, हिमांशू अशर, संजय पतौडीया, अर्शद खान प्रस्तुत किशोर खिल्लारे, सुभाष गुप्ता, सतीश गुप्ता आणि जगदीश लाडे सहनिर्मित 'सूर सपाटा'च्या निमित्ताने तब्ब्ल २५ दिग्ग्ज कलावंतांचा ताफा आमने-सामने येणार असून ह्या गुलदस्त्यातील  महत्वाच्या उपेंद्र लिमये आणि संजय जाधव यांच्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांसाठी खास उलगडण्यात आल्या आहेत तर इतर कलावंतांची माहिती मिळवण्यासाठी आपल्याला आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. अनेक दर्जेदार चित्रपटांतून आपली छाप सोडणारा राष्ट्रीय पुरस्कारविजेता बाल कलाकार हंसराज जगताप, यश कुलकर्णी, चिन्मय संत, चिन्मय पटवर्धन, रुपेश बने, जीवन कळारकर, सुयश शिर्के यांसोबतच शरयू सोनावणे आणि निनाद तांबावडे, हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेते गोविंद नामदेव, उपेंद्र लिमये, प्रविण तरडे, आनंद इंगळे, संजय झाडबुके, अभिज्ञा भावे, नेहा शितोळे आदींच्या प्रमुख भूमिका 'सूर सपाटा'मध्ये आपल्याला पहायला मिळतील. पटकथा मंगेश कंठाळे व अमित बैचे यांचीआहे. तर संवादलेखन अमित बैचे यांनीच केले आहे. चित्रपटाचा कॅनव्हास सिनेमॅटोग्राफर विजय मिश्रा यांच्यालेन्समधून चित्रित करण्यात आला आहे.अभिनय जगतापचे श्रवणीय संगीत चित्रपटाला लाभले आहे.
अनेक चित्रपट आणि मालिकांना मार्गदर्शन  करणाऱ्या संजय जाधवांचे नेतृत्व 'सूर सपाटा'तील विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मदत करते हे पाहणे रंजक ठरणार आहे. 'सूर सपाटा' २१ मार्चला होळीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Sanjay Jadhav's villainous style in 'Sur Sapata'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.