रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजय दत्त, साकारणार 'ही' खास भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 11:30 IST2025-11-07T11:29:12+5:302025-11-07T11:30:32+5:30
बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटामध्ये खास भूमिका साकारणार आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार संजय दत्त, साकारणार 'ही' खास भूमिका
Riteish Deshmukh Raja Shivaji: बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त आता मराठी ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे. अभिनेता रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' या चित्रपटामध्ये खास भूमिका साकारणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणाऱ्या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे. या सिनेमात रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. 'राजा शिवाजी'चे दिग्दर्शनही रितेशच करतो आहे. या चित्रपटाला अधिक भव्यता देण्यासाठी रितेश देशमुखने संजय दत्तला साईन केले आहे. 'राजा शिवाजी'मध्ये संजय दत्तच्या एन्ट्रीमुळे चाहते खूश झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'राजा शिवाजी' या भव्य चित्रपटामध्ये संजय दत्त हा क्रूर आणि शक्तिशाली सरदार 'अफजल खानाची' भूमिका साकारणार आहे. अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संघर्ष हा मराठा इतिहासातील सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. संजय दत्तच्या येण्याने या भूमिकेला एक वेगळी धार येणार आहे. संजय दत्त यापूर्वीही 'अग्निपथ' आणि 'केजीएफ २' सारख्या चित्रपटांमध्ये नकारात्मक आणि क्रूर भूमिकांमध्ये आपली छाप पाडून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे अफजल खानसारख्या ऐतिहासिक भूमिकेत त्याला पाहणे प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी ठरणार आहे.
समलान खानची एन्ट्री
दरम्यान, बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खान देखील या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तो या सिनेमात छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातल्या जीवाभावाच्या मावळ्याची भूमिका साकारणार आहे. जिवा महाला या शूर मावळ्याची भूमिका सलमान साकारणार आहे. जिवाजी महाले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक होते. दांडपट्टा चालवण्यात तरबेज असणाऱ्या जीवा महाला यांनीच प्रतापगडाच्या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांना वाचवले होते. त्यामुळेच "होता जीवा, म्हणून वाचला शिवा" हे वाक्य म्हटलं गेलेलं.
'राजा शिवाजी'साठी प्रेक्षक उत्सुक
रितेश देशमुख हा 'राजा शिवाजी' या चित्रपटासाठी तो मोठी तयारी करत आहे. हा चित्रपट त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट आहे. रितेशने यापूर्वी 'वेड' आणि 'लय भारी' यांसारख्या चित्रपटांतून मराठी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. 'राजा शिवाजी' सिनेमाची निर्मिती जिनिलीया देशमुख आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. अजय-अतुल यांनी सिनेमाला संगीत दिलं आहे. यात संजय दत्त आणि सलमानशिवाय, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी, भाग्यश्री अशी स्टारकास्ट आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. मराठीसोबतच हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम अशा सहा भाषांमध्ये सिनेमा रिलीज केला जाणार आहे.