मराठी सिनेसृष्टीला मिळाला एक हिरो, या सिनेमातून करणार पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 14:54 IST2019-03-27T14:50:45+5:302019-03-27T14:54:00+5:30
'मिरांडा हाऊस'च्या निमित्ताने मिलिंद गुणाजीसुद्धा बऱ्याच काळाने मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत.

मराठी सिनेसृष्टीला मिळाला एक हिरो, या सिनेमातून करणार पदार्पण
सध्या मराठीमध्ये वेगवेगळ्या विषयांवर अनेक चांगले चित्रपट येत आहेत. सोबतच मराठी चित्रपटामध्ये खूप चांगले प्रयोगही होत आहेत. अशाच एका वेगळ्या विषयावर आधारित 'मिरांडा हाऊस' चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून हिरो म्हणून साईंकित कामत झळकणार आहे. विविध मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला साईंकित कामत आता लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.
छोट्या पडद्यावर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अभिराम या भूमिकेतून तो घराघरात पोहचला होता. छोट्या पडद्यावर नशीब आजमवल्यानंतर आता साईंकित रूपेरी पडद्यावर एंट्री करण्यासाठी सज्ज झाला आहे. लवकरच 'मिरांडा हाऊस' या चित्रपटातून साईंकित मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय. चित्रपटाच्या नावावरूनच हा रहस्यमय चित्रपट असणार हे नक्की. त्यामुळे या चित्रपटात साईंकितची नेमकी भूमिका काय असणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आजवर साईंकितने सालस, समंजस तरीही वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या भूमिकेतूनही त्याचे वेगळेपण प्रेक्षकांसमोर येणार, यात शंका नाही. या चित्रपटात साईंकितसोबत पल्लवी सुभाष, मिलिंद गुणाजी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. 'मिरांडा हाऊस'च्या निमित्ताने मिलिंद गुणाजीसुद्धा बऱ्याच काळाने मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. 'अ रेनी डे', 'सावरिया.कॉम' आणि 'सावली' असे वैविध्यपूर्ण विषय हाताळणाऱ्या राजेंद्र तलाक यांनी 'मिरांडा हाऊस'चे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट १९ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.