Sai Tamhankar : “मला पाहून मीडियाने....”, आयफा सोहळ्यात सई ताम्हणकरला अपमानास्पद वागणूक....!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 10:38 IST2022-11-09T10:32:00+5:302022-11-09T10:38:26+5:30
Sai Tamhankar : ‘मिमी’ या चित्रपटासाठी सईला आयफा, फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सईसाठी हा क्षण अभिमानाचा क्षण होता. पण अशाच एका बॉलिवूड सोहळ्यादरम्यान असं काही घडलं की, सई दुखावली गेली.

Sai Tamhankar : “मला पाहून मीडियाने....”, आयफा सोहळ्यात सई ताम्हणकरला अपमानास्पद वागणूक....!
सई ताम्हणकर ( Sai Tamhankar) हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. मराठीसोबतच हिंदी सिनेमांत आपली स्वत:ची ओळख निर्माण करणारी सई चाहत्यांची लाडकी अभिनेत्री. ‘मिमी’ या बॉलिवूड सिनेमानंतर सई लवकर इम्रान हाश्मीसोबत ‘ग्राऊंड झिरो’ या सिनेमात झळकणार आहे. ‘मिमी’ या चित्रपटासाठी सईला आयफा, फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सईसाठी हा क्षण अभिमानाचा क्षण होता. पण अशाच एका बॉलिवूड सोहळ्यादरम्यान असं काही घडलं की, सई दुखावली गेली. एका मुलाखतीत तिने एक धक्कादायक खुलासा केला. सईने या मुलाखतीचा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
‘सिद्धार्थ कनन’ला दिलेल्या मुलाखतीत सईने हा खुलासा केला. ‘रेड कार्पेटवर किंवा एखाद्या कार्यक्रमात तू गेलीस आणि मीडियाने कॅमेरा दुसरीकडे फिरवला, असं कधी झालं आहे का?,’ असा प्रश्न सईला या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर तिने होकारार्थी उत्तर दिलं.
‘हो, असं माझ्यासोबत घडलं आहे. यंदाच्या आयफा (Iifa award) पुरस्कार सोहळ्यातच हे घडलं. मला पाहून काही मीडिया आणि इनफ्ल्यूएन्सरनी त्यांचे कॅमेरे दुसरीकडे फिरवले,’असं सई म्हणाली. त्यांची नाव सांगण्यास मात्र तिने नकार दिला. मी त्यांची नावं सांगू शकत नाही, असं ती म्हणाली.
रेड कार्पेटवर असं डावल्यावर नेमकं काय वाटलं? असं विचारल्यावर ती म्हणाली, ‘निश्चितपणे हा प्रकार दुखावणारा असतो. अशा डावलण्याचं दु:ख वाटणं स्वाभाविक आहे. पण खरं सांगू, अशा प्रकारामुळे मला अधिक बळ मिळत. अशा गोष्टी मला नवी ऊर्जा देऊन जातात. अशा अपमानाला आपण आपल्या कामानेच उत्तर देऊ शकतो. एक दिवस असा येईल की ही माणसं माझ्यासाठी येतील आणि मी तिथून निघून जाईल.’