सचिन पिळगावकर यांनी ट्रोल करणाऱ्यांना दिला आशीर्वाद, म्हणाले "टीकाकारांना मी त्यांच्याच"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 16:06 IST2026-01-02T16:05:18+5:302026-01-02T16:06:06+5:30
अखेर सचिन पिळगावकर यांनी ट्रोलिंगवर दिली प्रतिक्रिया, म्हणाले "आजवर मी जे काही कमावलं..."

सचिन पिळगावकर यांनी ट्रोल करणाऱ्यांना दिला आशीर्वाद, म्हणाले "टीकाकारांना मी त्यांच्याच"
Sachin Pilgaonkar Reacts On Trolling: सचिन पिळगावकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय आणि बहुआयामी कलाकार आहेत. ते अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, गायक आणि पटकथालेखक म्हणून ओळखले जातात. बालकलाकार म्हणून त्यांनी अभिनय करायला सुरुवात केली होती. केवळ मराठी नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली आहे. इतकं असूनही सचिन पिळगावकर गेल्या काही वर्षात बरंच ट्रोल होत आहेत. त्यांच्यावरील विविध मिम्सही सोशल मीडियावर व्हायरल होतात. ट्रोलिंगवर पहिल्यांदाच त्यांची लेक श्रिया पिळगावकर हिने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४'च्या निमित्तानं सचिन पिळगावकर यांनी नुकतंच 'मुंटा'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केलं. ते म्हणाले, "मुळात ट्रोलिंग करणाऱ्यांना तुम्ही केलेलं काम माहीत नसेल, तर त्यांना बोलण्यात काही अर्थ नाही. करिअरच्या ६२व्या वर्षी मी त्यांना इतका महत्त्वाचा वाटत असेन, लोकप्रिय असेन, तर आजवर मी जे काही कमावलं, ती परमेश्वराची कृपा आहे".
सचिन पुढे म्हणाले, "कदाचित टीकाकारांना मी त्यांच्या वयाचा वाटतो, म्हणून ते टीका करतात. माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या किती मोठी आहे, याची मला जाणीव आहे. मी काम करत राहणार. तुमचं भलं व्हावं, असा आशीर्वाद टीकाकारांना देईन", या शब्दात त्यांनी ट्रोलिंग करणाऱ्यांना उत्तर दिलं.
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ४'साठी प्रेक्षक उत्सुक
'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवीन वर्षात ३ जानेवारीपासून हा शो सुरू होणार आहे. रात्री ९ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.नवोदित अभिनेत्री साजिरी जोशी या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडणार आहे. या पर्वातही जजच्या भूमिकेत दिसतील सचिन पिळगावकर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंत आणि तरुणाईच्या गळ्यातला ताईत असणारा गायक आदर्श शिंदे हे दिसतील.