रिंकू राजगुरूचा 'आशा' सिनेमा या दिवशी येणार भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 19:40 IST2025-12-10T19:39:05+5:302025-12-10T19:40:08+5:30
Rinku Rajguru : अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच 'आशा' सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तिने आशा नामक आरोग्य यंत्रणेतील कर्मचारीची भूमिका साकारली आहे.

रिंकू राजगुरूचा 'आशा' सिनेमा या दिवशी येणार भेटीला
अभिनेत्री रिंकू राजगुरू लवकरच 'आशा' सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तिने आशा नामक आरोग्य यंत्रणेतील कर्मचारीची भूमिका साकारली आहे. जी फक्त एक कर्मचारी नसून प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबासाठी मार्गदर्शक, आधार आणि निर्भय आवाज आहे. तिच्या डोळ्यांतून दिसणारा संघर्ष, तिच्या पावलांतून जाणवणारी जबाबदारी आणि संकटांचा सामना करताना न हरता उभी राहणारी ताकद आहे. या सर्वांमुळे ही भूमिका चित्रपटाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
‘आशा’मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. या कथानकाच्या केंद्रस्थानी आहे आशा सेविका आणि ही भूमिका साकारत आहे रिंकू राजगुरू. या व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
दिपक पाटील दिग्दर्शित 'आशा'चे कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, निलेश कुवर, दैवता पाटील आणि दिपक पाटील निर्माते आहेत. तर मुरलीधर चटवानी आणि रवींद्र औटी सहनिर्माते आहेत. पॅनोरमा स्टुडिओजच्या माध्यमातून प्रदर्शित होणारा हा चित्रपट नाविन्यपूर्ण कथानक आणि वास्तववादी मांडणी घेऊन भेटीला येत आहे. ‘आशा’ हा चित्रपट येत्या १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून, टीझर, गाणं आणि ट्रेलरमुळे आधीच निर्माण झालेली उत्सुकता पाहता, हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक प्रभावी आणि भावस्पर्शी अनुभव ठरणार आहे, हे नक्की.