लेकीचं काम पाहून आई-वडिलांना आलं भरून, 'आशा' सेविकेच्या भूमिकेत रिंकू राजगुरूचा कसदार अभिनय
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 15:36 IST2025-12-19T15:34:21+5:302025-12-19T15:36:40+5:30
'आशा' चित्रपटाच्या प्रीमियर शोला रिंकूचे आई आणि वडील उपस्थित होते.

लेकीचं काम पाहून आई-वडिलांना आलं भरून, 'आशा' सेविकेच्या भूमिकेत रिंकू राजगुरूचा कसदार अभिनय
Rinku Rajguru Asha Movie : 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू हिचा बहुप्रतिक्षित 'आशा' हा चित्रपट आज, १९ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या रिंकूने या चित्रपटात एका 'आशा' सेविकेची आव्हानात्मक भूमिका साकारली आहे. 'आशा'मध्ये महिलांची झगडणारी दुनिया, त्यांचा आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी अतिशय भावस्पर्शी पद्धतीने मांडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या या चित्रपटाच्या प्रीमियरला रिंकूच्या आई-वडिलांनी हजेरी लावली होती. यावेळी एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. रिंकूचा अभिनय पाहून तिच्या आई-वडिलांना आपले अश्रू रोखता आले नाहीत.
'आशा' या चित्रपटात रिंकूने एका आरोग्य कर्मचाऱ्याची भूमिका साकारली आहे. अनेक कठीण प्रसंगांतून वाट काढणारी आणि लोकांच्या आरोग्यासाठी रात्रंदिवस झटणारी आशा सेविका रिंकूने अत्यंत प्रभावीपणे जिवंत केली. मोठ्या पडद्यावर आपल्या लेकीने मांडलेला हा गंभीर विषय आणि तिचा कसदार अभिनय पाहून रिंकूच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले. आई आणि वडिलांना भावुक झालेलं पाहून रिंकूने त्यांना जवळ घेत मीठी मारली.

आर्ची'च्या प्रतिमेतून बाहेर पडत रिंकूने 'कागर', 'सैराट', 'झुंड' यांसारख्या चित्रपटांतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'आशा' या चित्रपटाद्वारे तिने पुन्हा एकदा सामाजिक विषयाला हात घातला. रिंकू व्यक्तिरिक्त या चित्रपटात सायंकित कामत, उषा नाईक, शुभांगी भुजबळ, सुहास शिरसाट, दिशा दानडे, दिलीप घारे आणि हर्षा गुप्ते यांसारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकले आहेत.