Vijay chavan funeral : या कारणामुळे विजय चव्हाण यांच्या अंतिम दर्शनाच्यावेळी भडकल्या अलका कुबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 14:33 IST2018-08-24T14:30:42+5:302018-08-24T14:33:30+5:30
विजय चव्हाण यांना त्यांच्या सहकलाकारांनी साश्रु नयनांनी अखेरचा निरोप दिला. पण त्यांच्या अंतिम दर्शनाच्या वेळी सामान्य लोक ज्याप्रमाणे वागत होते, त्यावर अभिनेत्री अलका कुबल प्रचंड भडकल्या होत्या.

Vijay chavan funeral : या कारणामुळे विजय चव्हाण यांच्या अंतिम दर्शनाच्यावेळी भडकल्या अलका कुबल
विजय चव्हाण यांच्या मुलुंडमधील राहात्या घरी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कलाकारांची रांग लागली आहे. महेश कोठारे, अंकुश चौधरी, अलका कुबल, सुशांत शेलार यांसारख्या कलाकारांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. आपल्या सहकलाकाराला साश्रु नयनांनी त्यांनी अखेरचा निरोप दिला. पण त्यांच्या अंतिम दर्शनाच्या वेळी सामान्य लोक ज्याप्रमाणे वागत होते, त्यावर अभिनेत्री अलका कुबल प्रचंड भडकल्या होत्या.
आपल्या आवडत्या कलाकारांना पाहून उपस्थित असलेले लोक त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होते. लोकांना परिस्थितीचे गांभीर्य नसल्यामुळे अलका कुबल यांना चांगलाच राग आला होता. सेल्फी काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांवर त्या संतापल्या होत्या. आपल्या सहकलाकाराला, जवळच्या मित्राला निरोप देताना सगळेच कलाकार भावुक झाले होते. अशा परिस्थितीत लोक त्यांचे फोटो काढत असल्याने तसेच त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत असल्याने सगळ्याच कलाकारांना राग आला होता.
ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने आज सकाळी निधन झाले. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्वास घ्यायला त्रास होत असल्याच्या तक्रारीनंतर बुधवारी (22 ऑगस्ट) विजय चव्हाण यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. चित्रपट, नाटकातील त्यांच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र प्रेक्षक कधीचं विसरू शकत नाहीत. गेल्या कित्येक दिवसांपासून विजय चव्हाण आजारी होते. विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली. हे नाटक त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यामुळे मिळाले होते. खरे तर या नाटकासाठी लक्ष्मीकांत यांना विचारण्यात आले होते. पण हे नाटक प्रायोगिक रंगभूमीवर विजय चव्हाण सादर करत असत आणि हे नाटक लक्ष्मीकांत यांनी पाहिले होते. त्यांनीच या भूमिकेसाठी विजय चव्हाण योग्य असल्याचे निर्मात्यांना सांगितले होते.
विजय चव्हाण यांनी आतापर्यंत 350-400 चित्रपटांमध्ये काम केले. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 साली प्रदर्शित झालेल्या वहिनीची माया या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.