रितेश देशमुखसोबतच्या वादामुळे सोडला 'राजा शिवाजी' सिनेमा? रवी जाधव म्हणाले- "या सिनेमाची कल्पना माझी होती, पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 16:23 IST2026-01-08T16:20:52+5:302026-01-08T16:23:05+5:30
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' सिनेमा सुरुवातीला रवी जाधव दिग्दर्शित करणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांना सिनेमातून माघार घ्यावी लागली होती. रितेश आणि रवी जाधव यांच्यात वाद झाल्याने त्यांनी हा सिनेमा सोडल्याचं बोललं जात होतं. यावर रवी जाधव यांनी भाष्य केलं आहे.

रितेश देशमुखसोबतच्या वादामुळे सोडला 'राजा शिवाजी' सिनेमा? रवी जाधव म्हणाले- "या सिनेमाची कल्पना माझी होती, पण..."
रितेश देशमुख सध्या 'राजा शिवाजी' या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शनही रितेश करणार असून सिनेमात तो छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. पण, रितेश देशमुखचा हा सिनेमा सुरुवातीला मराठीतील लोकप्रिय दिग्दर्शक रवी जाधव दिग्दर्शित करणार होते. मात्र काही कारणांमुळे त्यांना सिनेमातून माघार घ्यावी लागली होती. रितेश आणि रवी जाधव यांच्यात वाद झाल्याने त्यांनी हा सिनेमा सोडल्याचं बोललं जात होतं. यावर पहिल्यांदाच रवी जाधव यांनी भाष्य करत खरं काय ते सांगितलं आहे.
रवी जाधव यांनी 'कॅच अप' या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. राजा शिवाजी सिनेमाबाबत विचारल्यावर ते म्हणाले, "तेव्हा सिनेमाचं नाव 'छत्रपती शिवाजी' होतं. २०१५ ला माझ्या डोक्यात कल्पना आली होती की रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या लूकमध्ये कसे दिसतील...कारण ते कोणाचाच कधी एकेरी उल्लेख करत नाहीत. ते नेहमी अहो जाओ करतात. त्यांचा स्वत:चा एक खानदानी ऑरो आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात आलं की हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून कसे दिसतील? तिथूनच ही प्रोसेस सुरू झाली होती. आम्ही सिनेमा लिहायला सुरुवात केली. रितेशने सांगितलं की ते त्यांची प्रोडक्शन कंपनी मुंबई फिल्म्स तर्फे सिनेमाची निर्मिती करतील. मला अभिनेता आणि निर्माता दोन्ही मिळाले होते. त्यानंतर आम्ही ड्राफ्ट लिहायला सुरुवात केली. आधी तेजपाल वाघ, मग विश्वास पाटील, मग क्षितीज पटवर्धनने सिनेमा लिहिला. जवळपास ३-४ वर्ष हे सुरू होतं. त्यानंतर आम्ही रितेश देशमुख यांची लूक टेस्ट केली आणि पोस्टरही डिझाइन केलं".
...म्हणून 'राजा शिवाजी' सिनेमा सोडावा लागला
"त्यानंतर दुर्देवाने माझ्या पर्सनल आयुष्यात काही गोष्टी घडल्या. माझ्या मुलाच्या तब्येतीमुळे मी थोडा मागे पडत गेलो. कदाचित बॅन्जो सिनेमाच्या अपयशानंतर मला दिग्दर्शन येतं की नाही, असा प्रश्नही निर्मात्यांच्या मनात आला असेल. त्यांना असं वाटलं असेल की याला दिग्दर्शनच येत नाही, मग एवढा मोठा सिनेमा कसा करू शकतो? सगळं काही ठरलं होतं", असं म्हणत त्यांनी नेमकं कारण सांगितलं.
पुढे ते म्हणाले, "राजा शिवाजी सिनेमाचं शूटिंग सुरू झाल्यानंतर मी त्या सेटवर गेलो होतो. ज्या पद्धतीने रितेश देशमुख हा सिनेमा करत आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी स्वत:ला झोकून दिलंय ते खरंच कौतुकास्पद आहे. आम्ही २०१४-१५ ला एक छोटं स्वप्न बघितलं होतं. पण, आज ते ज्या उंचीचा सिनेमा करत आहेत. त्या पद्धतीने मी या सिनेमाचा विचारच केला नव्हता. माझ्यानंतर नागराज मंजुळे हा सिनेमा दिग्दर्शित करणार होता. तेव्हादेखील रितेश यांनी मला फोन केला होता. जेव्हा ते स्वत: दिग्दर्शन करणार असं ठरलं, तेव्हाही त्यांनी मला फोन केला होता".
रितेश देशमुखसोबतच्या वादावर दिलं स्पष्टीकरण
"आमचं एकाही शब्दाचं भांडण नाही. आमच्यात विसंवादही नाहीत. जेव्हा जेव्हा आम्हाला एकमेकांना फोन करावासा वाटतो, आम्ही करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवरचा सिनेमा बनवायचा ही कल्पना होती. पण, ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे हा सिनेमा माझी कल्पना आहे असं मी म्हणू शकत नाही. मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेश देशमुख दिसले. हे क्रेडिट मी नक्कीच घेऊ शकतो की महाराष्ट्रात रितेश देशमुख यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बघणारा मी पहिला दिग्दर्शक आहे. पण, त्यानंतर ते त्या भूमिकेच्या प्रेमात पडले. ते सिनेमा कधीही करूही शकले असते. पण, जोपर्यंत त्यांना वाटलं नाही की त्या उंचीचा सिनेमा बनेल तोपर्यंत ते थांबले होते", असं रवी जाधव म्हणाले.