तरुणांना लाजवेल असा उत्साह होता रमेश देव यांचा नव्वदीत, त्यांच्या डान्सचा व्हिडिओ झाला होता प्रचंड व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 22:44 IST2022-02-02T22:42:32+5:302022-02-02T22:44:28+5:30
Ramesh Deo Passed Away at 93: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

तरुणांना लाजवेल असा उत्साह होता रमेश देव यांचा नव्वदीत, त्यांच्या डान्सचा व्हिडिओ झाला होता प्रचंड व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव (Ramesh Deo) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चार दिवसांपूर्वी त्यांनी ९३वा वाढदिवस साजरा केला होता. नायक, सहनायक, चरित्र अभिनेते, खलनायक, निर्माते, दिग्दर्शक या सगळ्या भूमिका त्यांनी उत्तमरित्या पार पाडल्या होत्या. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर ते यशस्वी ठरले होते. वेळेच्या बाबतीत काटेकोर असणारा अभिनेता अशी त्यांची ख्याती होती. रमेश अगदी शेवटपर्यंत सच्चा कलाकार म्हणून जगले. हे त्यांच्या शेवटच्या काळात गाजलेल्या एका व्हायरल व्हिडीओवरून लक्षात येते. या व्हायरल व्हिडीओतील रमेश देव यांचा उत्साह पाहून तरूणही लाजले.
दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात रमेश देव आणि सीमा देव व्यासपीठावर होते. 'सूर तेच छेडिता' हे गाणे वाजायला लागल्यावर रमेश देव उत्साहाने खुर्चीवरून उठून नाचू लागले, ते पाहता सर्वच उपस्थितांनी त्यांच्या उत्साहाला आणि उस्फूर्त जगण्याला दाद दिली होती. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता आणि सगळ्यांनीच त्यांच्या उत्साहाचे कौतुक केले होते.
रमेश देव यांचा जन्म ३० जानेवारी १९२९ रोजी कोल्हापूरला झाला. त्यांची कारकीर्द तब्बल ६ दशकांहून जास्त होती. वयाची ऐंशी उलटलेली असतानाही त्यांनी काही जाहिराती आणि शॉर्टफिल्ममध्ये काम केले.