"दहावीत असताना पहिली सिगारेट प्यायलो...", पुष्कर श्रोत्रीचा खुलासा, सांगितला मजेशीर किस्सा; म्हणाला- "सिगारेट ओढल्यानंतर..."
By कोमल खांबे | Updated: October 29, 2025 13:33 IST2025-10-29T13:32:51+5:302025-10-29T13:33:35+5:30
पुष्करने त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. दहावीत असताना पहिली सिगारेट ओढल्याचं पुष्करने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

"दहावीत असताना पहिली सिगारेट प्यायलो...", पुष्कर श्रोत्रीचा खुलासा, सांगितला मजेशीर किस्सा; म्हणाला- "सिगारेट ओढल्यानंतर..."
पुष्कर श्रोत्री हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता. अनेक मालिका, नाटक आणि सिनेमांमध्येही त्याने काम केलं आहे. अभिनेता असण्यासोबतच पुष्कर एक उत्तम दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. पुष्करचा चाहता वर्गही मोठा आहे. आपल्या आवडत्या कलाकाराबद्दल जाणून घेण्यात चाहत्यांनाही रस असतो. आता पुष्करने त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. दहावीत असताना पहिली सिगारेट ओढल्याचं पुष्करने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
पुष्करने 'आरपार' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने शाळेत असताना पहिल्यांदा सिगारेच ओढल्याची कबुली देत एक मजेशीर किस्साही शेअर केला. पुष्कर म्हणाला, "पहिली सिगारेट मी दहावीत असताना माझ्या मित्राच्या घरी प्यायलो होतो. आमची दुपारची शाळा असायची. मी जेव्हा त्याच्याकडे गेलो आणि बेल वाजवली. तेव्हा बराच वेळ झाला त्याने दार उघडलं नाही. मी म्हटलं एवढा वेळ... मग परत बेल वाजवल्यावर त्याने दार उघडलं. मित्र म्हणाला तू आहेस का ये आतमध्ये... घरात गेल्यावर त्याने मला विचारलं सिगारेट प्यायचीये? मला तो म्हणाला तू आलास तेव्हा मी सिगारेट पीत होतो. ते लपवण्यात हा वेळ गेला".
"आदल्या दिवशी त्याच्या घरात जी पार्टी झाली होती. त्या पार्टीत त्याच्या वडिलांचं एक सिगारेटचं पाकिट खाली पडलेलं त्याला सापडलं होतं. त्यातून सिगारेट काढून आम्ही प्यायलो. पण, सिगारेट प्यायल्यानंतर दरदरून फाटली. हाताचा वास कसा जाईल... त्यासाठी साबण लावला, बोटं चोळली. मग तोंडाचा वास घालवण्यासाठी दात घासले. मग लसणाची चटणी खाल्ली", असं पुष्करने सांगितलं.