देशभरातील नाट्यकर्मींचे प्रयोग पाहण्याची पुणेकरांना संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:57 IST2016-01-16T01:11:53+5:302016-02-05T08:57:16+5:30

महाराष्ट्राच्या रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत. या रंगभूमीची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असली, तरी देशभरातील रंगभूमीवर काय ...

Puneites have the opportunity to see the use of dramatics all over the country | देशभरातील नाट्यकर्मींचे प्रयोग पाहण्याची पुणेकरांना संधी

देशभरातील नाट्यकर्मींचे प्रयोग पाहण्याची पुणेकरांना संधी

ाराष्ट्राच्या रंगभूमीवर सातत्याने नवनवीन प्रयोग होत आहेत. या रंगभूमीची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली असली, तरी देशभरातील रंगभूमीवर काय काम चाललेय, याची माहिती सामान्य प्रेक्षकांना होत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुण्यात नाटकाचं उत्तम वातावरण असूनही भारतीय रंगभूमीचा परार्मश घेत जाणारा एखादा नाट्यमहोत्सव इथे आयोजित होत नाही. याच जाणिवेतून मराठी नाट्यक्षेत्रात वेगळं, सरस आणि धडाकेबाज काम करणार्‍या एक्स्प्रेशन लॅब, नाटकघर आणि महाराष्ट्र कल्चरल सेंटर या तीन संस्थांनी एकत्र पुढाकार घेऊन एका अभिनव प्रकल्पाची सुरुवात करण्याचं ठरवलं आहे. भारतभरात विविध ठिकाणी वेगळं काही करू पाहणार्‍या नाट्यकर्मींना पुणेकर नाट्यरसिकांसमोर आणण्याचा हा प्रकल्प आहे. अतुल पेठे, प्रदीप वैद्य आणि शुभांगी दामले यांनी आपापल्या संस्थांच्या माध्यमातून या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन हा उपक्रम सुरू करायचं ठरवलं आहे.
या उपक्रमाविषयी महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या शुभांगी दामले सांगतात, की आपल्याकडे केवळ पुण्या-मुंबईचीच नाटके पाहिली जातात. महाराष्ट्राबाहेरील रंगभूमीवर काय प्रयोग होत आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. विविध भाषांमधील रंगभूमीवर नवीन काय चालू आहे, हे जाणून घेता यावे आणि संवाद व कलेची देवाणघेवाण व्हावी, हा या उपक्रमागील उद्देश आहे. एखादा महोत्सव नाही तर नाही; पण जमेल तेव्हा अशा विशेष नाट्यकर्मींना पुण्यात घेऊन यायचं, त्यांना पुणेकर प्रेक्षकांसमोर प्रयोग करायची संधी द्यायची आणि पुणेकरांना एका वेगळ्या पद्धतीचं काम पाहण्याचा आनंद द्यायचा, असा हा एकंदर उपक्रम आहे. या उपक्रमाचं पहिलं पान म्हणून दि. ५ व ६ डिसेंबर रोजी सुदर्शन रंगमंच येथे कोलकात्याच्या 'कसबा अघ्र्य' या नाट्यसंस्थेचे मोनीश मित्र यांनी दिग्दर्शित केलेल्या दोन नाट्यप्रयोगांचं मंचन होणार आहे. 'मॅकबेथ बाद्य' आणि 'रक्तभूमी प्रेम-पर्ब कथा' हे दोन नाट्यप्रयोग या वेळी होणार आहेत. प्रत्येक नाट्यप्रयोगाचे दोन खेळ सुदर्शन रंगमंच येथे अनुक्रमे सायंकाळी ६ आणि रात्री ८ वाजता असे दोन्ही दिवशी मिळून चार प्रयोग होतील. वर्षातून जेवढे शक्य आहे, त्यानुसार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुणेकरांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा.

Web Title: Puneites have the opportunity to see the use of dramatics all over the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.