'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:10 IST2025-10-08T17:09:10+5:302025-10-08T17:10:04+5:30
'दशावतार'च्या सीक्वेलवर प्रियदर्शिनी म्हणाली...

'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."
गेल्या काही दिवसात मराठी सिनेमांनी बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातला. १२ सप्टेंबर रोजी 'दशावतार','आरपार' आणि 'बिन लग्नाची गोष्ट' हे तीनही सिनेमे रिलीज झाले. दशावतार सिनेमाने तर चौथ्या आठवड्यातही पदार्पण केलं आहे. दिलीप प्रभावळकरांचा बाबुली चाहत्यांना खूप भावला आहे. कोकणातील संस्कृती, सौंदर्याचं दर्शन घडवणारा आणि मोठा संदेश देणारा हा सिनेमा आहे. 'दशावतार'चा सीक्वेलही येणार का? यावर नुकतंच प्रियदर्शिनी इंदलकरने उत्तर दिलं.
'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "बरेच जण असंच म्हणतायेत की 'दशावतार'चा सीक्वेल यावा. माझी तर खूप इच्छा आहे. सिनेमात बाबुली काका मला हे सांगून जातात की, 'भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी तुझी. तू हा लढा पुढे चालू ठेव'. यावरुन बरेच जण म्हणत आहेत की पार्ट २ आला तर त्यात वंदनाची भूमिका मोठी असेल. त्यामुळे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सीक्वेलचा विचार केला तर मी एका पायावर तयार आहे."
'दशावतार'च्या शेवटी बाबुली मेस्त्रीचं निधन होतं. तर वंदना म्हणजेच प्रियदर्शिनी समस्त गावकऱ्यांना गावाच्या हितासाठी लढा देण्याचा संदेश देते. 'दशावतार' सिनेमाच्या कमाईवर नजर टाकली तर, या सिनेमाने २५ कोटींहून अधिकची कमाई केलीय. जगभरात ‘दशावतार’ सिनेमाने २६.४३ कोटींची कमाई केली आहे. ओशन फिल्म्सची निर्मिती आणि झी स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या सुबोध खानोलकर लिखित दिग्दर्शित ‘दशावतार ‘ चित्रपटाने गेले तीन आठवडे थिएटरमध्ये रसिकांचा धो धो वर्षाव पाहिला. आता चौथ्या आठवड्यातही सिनेमाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे.