लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत प्रिया बेर्डेंची अशी वाढली जवळीक, अन् पहिल्या पत्नीबद्दल म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 16:59 IST2023-11-29T16:59:54+5:302023-11-29T16:59:54+5:30
Priya Berde : अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी नुकतेच 'लोकमत फिल्मी'च्या 'नो फिल्टर' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे किस्से, सिंगल मदर म्हणून स्ट्रगल, अपमान आणि राजकारण अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.

लक्ष्मीकांत बेर्डेंसोबत प्रिया बेर्डेंची अशी वाढली जवळीक, अन् पहिल्या पत्नीबद्दल म्हणाल्या...
अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) आज आपल्यात नाहीत, त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतून आपली अशी एक वेगळी प्रतिमा तयार केली होती. त्यांच्या अभिनयाचे आजही अनेक चाहते आहेत जे त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात आणि त्यांचे चित्रपट आवर्जून पुन्हा पुन्हा आवडीनं पाहतात. आजही त्यांच्या चाहत्यांना त्यांच्या खासगी आणि कारकीर्दीबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. दरम्यान नुकतेच अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे किस्से, सिंगल मदर म्हणून स्ट्रगल, अपमान आणि राजकारण अशा बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला. इतकेच नाही तर त्यांनी त्यांचे लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतचे असलेले नाते आणि त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दलही सांगितले.
प्रिया बेर्डे नो फिल्टर कार्यक्रमात लक्ष्मीकांत बेर्डेंसोबतच्या नात्याबद्दल म्हणाल्या की, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत काम करत असताना आमच्यात बॉण्डिंग वाढलं. त्यावेळी मी १९-२० वर्षांची होती आणि त्या काळात चांगलं वाईट काही कळत नव्हते. त्यात माझ्यावर घराची जबाबदारी होती. त्याकाळात मला लक्ष्मीकांत बेर्डेंचा सपोर्ट मिळत होता. त्यामुळे मी मैत्रीसाठी तयार झाले. माझ्या आई आणि लक्ष्मीकांत बेर्डेंमध्ये चांगलं बॉण्डिंग होतं. रुही माझ्या आईची चांगली मैत्रीण होती. असं काही होईल असं डोक्यात नव्हतं.
लक्ष्मीकांत बेर्डे माझे गुरू होते...
प्रिया बेर्डे पुढे म्हणाल्या की, त्यादरम्यान माझी आई आजारी पडली, तेव्हा एकटेपणा जाणवू लागला आणि आधाराची गरज वाटली. त्यावेळी आम्ही एकमेकांच्या जास्त जवळ आलो. त्याकाळात माणूस म्हणून कळले. ते विचारी होते. त्यांनी मला खूप चांगलं मार्गदर्शन केले. त्यांच्याकडे मी गुरू म्हणून पाहत होते. त्यावेळी प्रेमात पडायचे, असे डोक्यात नव्हते. काळाच्या ओघात आणि नशीबात ज्या गोष्टी असतात, त्या घडत असतात. त्यामुळे त्याचा जास्त विचार करायच नसतो.
लक्ष्मीकांत बेर्डे यांचे करिअर सेट करण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, त्यांना उभे करण्यासाठी रुही बेर्डेंचा खूप मोठा हात होता. लक्ष्मीकांत बेर्डेंचं करिअर, आयुष्य आणि स्थैर्यता रुही बेर्डेंमुळे आली, ही बाब नाकारता येणारच नाही, असे प्रिया बेर्डे रुही बेर्डेंबद्दल म्हणाल्या.