लग्नानंतर प्रिया बापटने आडनावच बदललं नाही कारण…; खुद्द अभिनेत्रीनेच बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 14:08 IST2023-05-08T14:07:30+5:302023-05-08T14:08:03+5:30
Priya Bapat : प्रिया बापटची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.

लग्नानंतर प्रिया बापटने आडनावच बदललं नाही कारण…; खुद्द अभिनेत्रीनेच बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा
अभिनेत्री प्रिया बापट (Priya Bapat) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान तिची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. तिने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने लग्नानंतर आडनाव का बदललं नाही, याचादेखील खुलासा केला आहे.
प्रिया बापट या पोस्टमध्ये म्हणाली की, प्रिय बाबा, आज तुमचा ८१ वा वाढदिवस. तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो हीच सदिच्छा. मी कितीही आईवेडी असले तरीही माझ्या वडिलांशी माझं असलेलं नातं जास्त युनिक आहे. प्रत्येक मोठा निर्णय घेताना आम्हा दोन चिमुरड्या मुलींना समोर बसवून त्यांचं मत विचारात घेणारे "माझे बाबा". अवाजवी हट्ट नाही, पण आपल्या मुलींचे शक्य ते सर्व लाड करणारे माझे बाबा. माझा हात धरून पहिल्यांदा मला शूटिंगच्या सेट वर घेऊन जाणारे आणि B. A Economics केल्यावर बँकेची परीक्षा दे म्हणून आग्रह धरणारे. आणि तरीही मी चित्रपट क्षेत्राची निवड केल्यावर ठामपणे माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे बाबा.
ती पुढे म्हणाली की, खरंतर खूप कमी व्यक्त होणारे, पण आईच्या तक्रारी घेऊन जेव्हा ते माझ्याकडे यायचे, तेव्हा मला पालकाच्या भूमिकेत बघायचे. विश्वास, जबाबदारी आणि प्रेम या तीनही भावनांशी ओळख करून देणारे आणि त्यांना कायम घट्ट धरून ठेवणारे माझे बाबा. मला खूप जणं विचारतात लग्नानंतर मी माझं आडनाव का नाही बदललं. कारण, I am proud to be ‘Sharad Bapat’s daughter. बाबा, तुम्ही मला "प्रिया" म्हटलत आणि "प्रिया शरद बापट" ही ओळख दिलीत जी मी आयुष्यभर जपेन.
प्रिया बापटच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळते आहे आणि ते या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.