"ही कचरा टाकायची जागा नाहीये, भान ठेवा", रायगडाची अवस्था बघून प्रवीण तरडे नाराज, पर्यटकांची केली कानउघाडणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 16:15 IST2025-11-17T16:14:55+5:302025-11-17T16:15:31+5:30
रायगडावर कचरा पाहून प्रविण तरडे अस्वस्थ झाले आहेत. प्रविण तरडेंनी रायगडावरुन व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.

"ही कचरा टाकायची जागा नाहीये, भान ठेवा", रायगडाची अवस्था बघून प्रवीण तरडे नाराज, पर्यटकांची केली कानउघाडणी
प्रविण तरडे हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रविण तरडे हे सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. सिनेमाचे आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स देण्यासोबतच प्रविण तरडे हे समाजातील अनेक विषयांवर पोस्टद्वारे भाष्यही करताना दिसतात. नुकतंच त्यांनी रायगडाला भेट दिली. पण, रायगडावर कचरा पाहून ते अस्वस्थ झाले आहेत. प्रविण तरडेंनी रायगडावरुन व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
इन्स्टाग्रामवरुन प्रविण तरडेंनी व्हिडीओ शेअर करत रायगडावरची परिस्थिती दाखवली आहे. या व्हिडीओत ते म्हणतात, "आज खरं तर डॉ. विश्वास पाटील सरांसोबत रायगड पाहायला आलोय. इतल्या भींती, दगडांना हात लावताना कधी तरी इथून महाराज गेले असतील. याला स्पर्श केला असेल. महाराजांच्या असण्याचा भास निर्माण होतो. आणि आपल्या लोकांनी काय केलंय ते बघायचंय का तुम्हाला?? म्हणजे आम्ही आता फिरत होतो. तर या ऐतिहासिक वस्तूंच्या खपच्यांमध्ये हे बघा(प्लास्टिकचे रॅपर्स). ज्याने कोणी हे इथं टाकलं असेल त्या माणसाला मी मनापासून विनंती करतो की बाबा तू परत रायगडावर येऊ नकोस. ही कचरा टाकायची जागा नाहीये. इथे आपल्या बापजाद्यांनी इतिहास घडवला. इथे त्यांनी रक्त सांडलं. छत्रपती शिवाजी महाराजांची ही पवित्र भूमी आहे. आजही महाराज इथे आहेत. ते कुठेही गेलेले नाहीत. याचं भान ठेवा".
विश्वास पाटील यांनी रायगडाचं वर्णन करताना म्हटलं की "आणि फक्त स्पर्श नव्हे तर परिस स्पर्श... म्हणजे लोखंडाला स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. तसं महाराजांनी या परिसराचं सोनं बनवलं आहे". या व्हिडीओतून प्रविण तरडेंनी पर्यटकांना विनंती केली आहे. "एवढे सगळे पर्यटक येतात त्या सगळ्यांना एकच विनंती आहे की बाबांनो आपला रायगड स्वच्छ ठेवा रे. रस्त्यावर पडलेला कचरा आम्ही उचलू तरी पण अशा दगडांच्या खाच्यात घातलेला कचऱ्याचं काय करायचं? हे आपल्या राजांचं आहे, आपलं आहे", असं ते म्हणाले आहेत.